मुंबई, 02 जुलै : ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) अर्थात स्तनांचा कर्करोग म्हटलं की महिलांचाच विचार केला जातो. स्तनांचा कॅन्सर विशेषतः महिलांमध्येच मोठ्या प्रमाणावर आढळतो. पण फक्त महिलाच नाही तर पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो. ब्रेस्ट कॅन्सर पुरुषांनाही (Breast Cancer in Male) होऊ शकतो आणि त्याबद्दलची जागरूकता फार कमी आहे. त्यामुळे (Oncologists) ऑन्कॉलॉजिस्ट्स (कर्करोगतज्ज्ञ) सातत्याने याकडे लक्ष वेधतात. HCG हॉस्पिटल्समध्ये सीनियर मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेले डॉ. राधेश्याम नाईक (Dr Radheshyam Naik) यांनी पुरुषांमधल्या ब्रेट कॅन्सरबद्दलच्या शंकांचं निरसन केलं आहे. पुरुषांमध्ये आढळणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरची कारणं, लक्षणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. - पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो का? - होय. स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या स्तनांमध्ये ऊतींचं प्रमाण (Quantity of Breast Tissue) खूप कमी असतं; पण पुरुषांच्या शरीराच्या अन्य अवयवांप्रमाणेच स्तनांमध्येही कर्करोगाचा शिरकाव होऊ शकतो. - पुरुषांमधल्या स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण किती आहे? - स्तनांचा कर्करोग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या लक्षात घेतली, तर त्यातले केवळ एक टक्का पुरुष असतात; मात्र त्या एक टक्का पुरुषांवरही उत्तम उपचारांची गरज असते. अन्यथा तो प्राणघातक (Fatal) ठरू शकतो. - पुरुषांमधल्या ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं काय आहेत? - स्तनाच्या भागात गाठ (Lump), अनैसर्गिक वाढ, अल्सर (Ulcer), दुर्गंध (Foul Smell) ही पुरुषांमधल्या ब्रेस्ट कॅन्सरची चार प्रमुख लक्षणं आहेत. कोणतंही लक्षण आढळल्यास लवकरात लवकर तपासणी करून घेणं चांगलं. - पुरुषांमधला ब्रेस्ट कॅन्सर आनुवंशिक असतो का? - यात आनुवंशिकतेचा मुद्दा फारसा महत्त्वाचा नाही; पण आधीच्या पिढीत किंवा कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सर (Family History) असेल, तर त्या कुटुंबातल्या पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. एखाद्या पुरुषाच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर असेल, तर अन्य कोणाच्या तुलनेत त्या पुरुषाला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. हे वाचा - Heart Attack मुळे मंदिराने गमावला आपला नवरा; कुणालाही हार्टअटॅक येताच करा 5 उपाय पण पुरुषांमध्ये याचं एकंदर प्रमाण कमी असतं. त्यामुळे पुरुषांनी दक्ष राहायला हवं; पण पॅनिक होण्याची गरज नाही. - ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता ओळखण्यासाठी फॅमिली हिस्ट्रीव्यतिरिक्त पुरुष कोणती तपासणी करून पाहू शकतो का? - BRCA म्युटेशन पॉझिटिव्ह आलं असेल, तर अशा पुरुषाने दक्ष राहायला हवं. कारण अशा पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. हे म्युटेशन असल्याचं केवळ रक्ताच्या विशिष्ट चाचणीतून कळतं आणि ते दुर्मीळ असतं. - ब्रेस्ट कॅन्सरचा सर्वांत जास्त धोका कोणत्या पुरुषांना असतो? - 40 ते 60 या वयोगटातल्या पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो. गायनॅकोमास्टिया (Gynaecomastia) अर्थात स्तन ग्रंथीच्या ऊतींच्या (Breast Gland Tissue) प्रमाणात वाढ होण्याची शक्यता या वयोगटातल्या पुरुषांमध्ये बऱ्यापैकी जास्त असते. ब्रेस्ट कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री, लठ्ठपणा, आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अभाव अशी कारणंही कर्करोग होण्याच्या शक्यतेला हातभार लावू शकतात. - पुरुषांच्या ब्रेस्ट कॅन्सरवर कोणते उपचार केले जातात? - केमोथेरपी, ऊती आक्रसून घेणे (Shrinking of Tissue), ऑपरेशन करून कॅन्सर झालेला भाग काढून टाकणं, हॉर्मोन थेरपीसह रेडिएशन थेरपी (Radiation Therapy with Hormone Therapy) अशी उपचारपद्धती वापरली जाते. ठरावीक दिवसांनी फॉलो-अप ट्रीटमेंट करून घ्यावी लागते; मात्र हा विकार बरा होऊ शकतो. - पुरुषांचा ब्रेस्ट कॅन्सर अन्य अवयवांत पसरू शकतो का? - तसा पसरण्याची शक्यता खूप जास्त असते. यापैकी अनेक पेशंट्स कॅन्सरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तोपर्यंत उशीर झालेला असतो. या कालावधीत कॅन्सर मान, छातीची पोकळी, यकृत, फुप्फुसं आणि काही वेळा अगदी मेंदूतही पसरलेला असू शकतो. पुरुषांमध्ये स्तनाच्या ऊतींचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे तिथून कॅन्सर शरीरात पसरण्याची शक्यता जास्त असते. - पुरुषांमधल्या ब्रेस्ट कॅन्सरचा प्रतिबंध कसा करायचा? - सर्व प्रकारची आजारपणं, विकार टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली (Healthy Lifestyle) ही महत्त्वाची बाब आहे. ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत, लवकर निदान झाल्यास प्राण वाचू शकतात आणि संबंधित रुग्णांचं आरोग्य चांगलं राहू शकतं. हे वाचा - एका घड्याळामुळे टळली त्याची वाईट वेळ; Smartwatch ने वाचवला जीव स्तनाच्या आकारात अनावश्यक वाढ किंवा घट झाल्याचं लक्षात आल्यास त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं सर्वांत आवश्यक असतं.