JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Asteroid Bennu पृथ्वीवर धडकणार? होत्याचं नव्हतं करू शकतो हा लघुग्रह

Asteroid Bennu पृथ्वीवर धडकणार? होत्याचं नव्हतं करू शकतो हा लघुग्रह

पृथ्वीसाठी धोकादायक असलेल्या लघुग्रहांमध्ये समावेश होत असलेल्या बेन्नू (Bennu) या लघुग्रहाची (Asteroid) पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता केवळ 0.037 टक्के एवढीच असल्याची माहिती अमेरिकेच्या नासा (NASA) या अंतराळ संशोधन केंद्रातल्या शास्त्रज्ञांनी दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑगस्ट: पृथ्वीसाठी धोकादायक असलेल्या लघुग्रहांमध्ये समावेश होत असलेल्या बेन्नू (Bennu) या लघुग्रहाची (Asteroid) पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता केवळ 0.037 टक्के एवढीच असल्याची माहिती अमेरिकेच्या नासा (NASA) या अंतराळ संशोधन केंद्रातल्या शास्त्रज्ञांनी दिली आहे. न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनमध्ये उभ्या असलेल्या 102 मजली एम्पायर स्टेट बिल्डिंग (Empire State Building) या गगनचुंबी इमारतीएवढा बेन्नूचा आकार आहे. ही टक्कर होण्याची शक्यता गृहीत धरलीच, तर 24 सप्टेंबर 2182 हा दिवस पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीवर (Earth) धडकला, तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकेल. त्या टकरीमुळे पृथ्वीवर लघुग्रहाच्या आकाराच्या 10 ते 20 पट आकाराचं विवर तयार होऊ शकेल, असं ‘नासा’तल्या अधिकारी लिंडली जॉन्सन यांनी सांगितलं. पृथ्वीनजीकच्या बेन्नूसह अन्य 17 लघुग्रहांपासून पृथ्वीला असलेल्या धोक्यांबद्दलचा लेख शास्त्रज्ञ डेव्हिड फार्नोचिया यांनी लिहिला होता. न्यूयॉर्क टाइम्सने या संदर्भात त्यांच्याशी साधलेल्या संवादानुसार, ‘बेन्नूपासून पृथ्वीला असलेल्या संभाव्य धोक्याची चिंता आता फारशी उरलेली नाही. तो धोका आता कमी झाला आहे. इसवी सन 2300 पर्यंत हा लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता केवळ 0.037 टक्के एवढीच आहे,’ असं फार्नोचिया यांनी सांगितलं. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, हा लघुग्रह इ. स. 2135पर्यंत पृथ्वीपासून सव्वा लाख मैलांच्या टप्प्यात येईल. हे अंतर पृथ्वीच्या चंद्रापासूनच्या अंतराच्या साधारण निम्मं आहे. बेन्नूच्या अभ्यासाची मोहीम बेन्नू हा उपग्रह अर्ध्या किलोमीटर व्यासाचा असून, त्यावर कार्बनचं (Carbon) प्रमाण मोठं आहे. पाणी आणि काही जड मूलद्रव्यंही त्यावर आढळली आहेत. या लघुग्रहाचं वय साडेचार अब्ज वर्षं आहे. भविष्यात या लघुग्रहाची पृथ्वीला धडक बसलीच, तर काय परिणाम होऊ शकतील, याचा अभ्यास करण्यासाठी ‘नासा’ने ओरिजिन्स स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटिफिकेशन सिक्युरिटी - रिगोलीथ एक्सप्लोअरर (OSIRIS-REx) ही मोहीम आखली होती. त्याअंतर्गत सप्टेंबर 2016मध्ये निघालेलं यान ऑगस्ट 2018मध्ये बेन्नूच्या कक्षेत पोहोचलं. दोन वर्षं त्याभोवती फिरून यानाने त्या लघुग्रहाच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला, नकाशे तयार केले. 21 ऑक्टोबर 2020 रोजी या यानाने लघुग्रहाच्या पृष्ठभागाला काही सेकंदं स्पर्श करून तिथले नमुने गोळा केले. मार्च 2021मध्ये हे नमुने घेऊन यानाने पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू केला असून, सप्टेंबर 2023मध्ये हे नमुने पृथ्वीवर येतील. त्यानंतर त्यांचा अभ्यास करून अधिक निष्कर्ष काढले जातील, अशी माहिती ‘संशोधन डॉट इन’ने दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या