नवी दिल्ली 04 ऑक्टोबर: लडाखमधल्या चीन सीमेवरचा तणाव अजुनही कायम आहे. भारत आणि चीन यांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत मात्र त्यातून काहीही तोडगा निघत नाही. चीन आडमुठी भूमिका घेत असून सतत कुरापती काढण्याचं काम सुरू आहे. चीनच्या विश्वासघातकीपणाचा अनुभव असल्याने भारतीय लष्कराने आता सर्व तयारी सुरू केली आहे. युद्धाचा प्रसंग आलाच तर लष्कर आणि हवाई दल एकाच वेळी आघाडी सांभाळणार असून कशा प्रकारे सामना करायचा याचा Action Plan तयार झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे. दहा महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ हे नवे पद तयार केलं होतं. माजी लष्कर प्रमुख बिपीन रावत यांची CDS म्हणून नियुक्तीही केली आहे. रावत तसेच लष्कर प्रमुख मनोज नरवणे आणी हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरीया यांच्या बैठकाही होत आहेत. नरवणे आणि भदौरीया या दोघांचेही शिक्षण पुण्यातल्या एनडीएमध्ये झालं असून ते उत्तम मित्रही आहेत. त्यामुळे त्यांच्यात उत्तम सवन्वय असल्याचं बोललं जातंय. हवाई दलाने आणि लष्कराने नेमकं काय करायचं. आघाड्या कशा सांभाळायच्या, शस्त्र आणि दारुगोळा यांचा पुरवढा आणि इतर गोष्टींचा सगळा प्लान तयार करण्यात आला असून त्याप्रमाणे तयारीलाही सुरूवात झाली आहे.
दरम्यान, चीनच्या कृत्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारत आता अमेरिकेकडून 30 MQ-9B गार्डियन ड्रोन (MQ-9B Sky Guardian drone) खरेदी करणार आहे. याद्वारे, LACरील चीनच्या प्रत्येक कृतीची जाणीव वेळेत होऊ शकते. लवकरच या ड्रोनशी संबंधित खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेत सादर करण्यात येणार आहे. यासह, भारत उपग्रह संप्रेषण यंत्राद्वारे आपल्या विद्यमान इस्त्राईल हेरॉनच्या ताफ्याला मजबूत करण्यासाठी सज्ज आहे. चीन सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेता भारत आपली संरक्षण खरेदी अधिक तीव्र करीत आहे. वेपन्स सिस्टम ते मिसाईल तंत्रज्ञानावर भारत अधिक भर देत आहे. गरजेनुसार काही शस्त्रे परदेशातूनही खरेदी केली जात आहेत.