बाळाचे डोळे खूप नाजूक असतात आणि त्यांना अगदी किरकोळ गोष्टींनीही दुखापत होऊ शकते. जर त्यांचे डोळे केमिकलच्या संपर्कात आले तर
मुंबई, 16 ऑगस्ट : लहान बाळांच्या डोळ्यांमध्ये काजळ (Kajal) घातलं जातं. खरं तर आपल्या देशात ही परंपराच मानली जाते. काजळ घातल्याने बाळांचे डोळे मोठे होतात, त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि दृष्ट लागत नाही, असाही समज आहे. काजळ घालणं योग्य आहे, पण ते योग्य पद्धतीने घातलं पाहिजे, ही त्याची मुख्य अट आहे. भारतात (India) बहुतेक महिला लहान मुलांसाठी घरीच ऑरगॅनिक काजळ तयार करतात. त्या काजळाचे बाळांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. पण दुकानातून विकत घेतलेल्या काजळामध्ये शिसं असतं, ते बाळ आणि मोठ्यांसाठीही हानिकारक असतं. दुकानात मिळणाऱ्या या काजळामुळे होणारे दुष्परिणाम जाणून घेऊयात. डोळ्यांत काजळ घातल्याने लहान मुलं अत्यंत गोंडस आणि सुंदर दिसतात; पण ते काजळ नैसर्गिक आणि सुरक्षित असायला हवं. तसंच यात कोणतंही रसायनं वापरलेली नाहीत, याची खात्री काजळ खरेदी करण्यापूर्वी पालकांनी करायला हवी. कारण बाळाचे डोळे खूप नाजूक असतात आणि त्यांना अगदी किरकोळ गोष्टींनीही दुखापत होऊ शकते. जर त्यांचे डोळे केमिकलच्या संपर्कात आले तर त्यांना आयुष्यभर डोळ्यांचा त्रास सहन करावा लागू शकतो, या संदर्भात ओन्ली माय हेल्थ डॉट कॉमने वृत्त दिलंय. इन्फेक्शन होण्याचा धोका लहान मुलं खूप संवेदनशील असतात आणि थोडासा निष्काळजीपणादेखील इन्फेक्शनला (Infection) कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे काजळ खरेदी करताना त्याचा प्रकार आणि त्याचं कॉम्पोझिशन तपासा, तसंच ते मुलांच्या डोळ्यांना हाताने लावू नका. घरात हाताच्या बोटाने मुलांच्या डोळ्यांत काजळ घातलं जातं, त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. हातावर बॅक्टेरिया असतील तर ते बाळाच्या डोळ्यांत शिरून इन्फेक्शन होऊ शकतं. या शिवाय आंघोळ करतानाही काजळ तोंडात जाऊ शकतं, जे खूप धोकादायक आहे. त्वचेच्या इन्फेक्शनचा धोका अनेकदा मुलं डोळे हाताने चोळतात. डोळ्यांत काजळ असलं की त्यांना त्वचेचं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्वचेवर पसरलेल्या काजळामुळे त्यांना त्वचेवर मुरुम, लहान फोड, पुरळ उठू शकतात आणि त्यामुळे त्यांची चिडचिड होऊ शकते. हे टाळण्यासाठी पालकांनी डोळ्यांतील जास्तीचं काजळ पुसून टाकणं आवश्यक आहे. डोळ्यांना खाज सुटणं काजळात शिसं असल्यास बाळाच्या डोळ्यात खाज येण्याची दाट शक्यता असते. दुकानातून विकत घेतलेलं काजळ लहान मुलांसाठी वापरणं सुरक्षित नाही, कारण त्यातील बहुतेकांमध्ये शिसं असतंच. यामुळे डोळ्यांना खाज सुटणं आणि लालसरपणा येणं हा त्रास तर होतोच पण मुलाच्या मेंदूच्या विकासातही अडथळा येतो. त्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी नैसर्गिक काजळ वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. दृष्टी प्रभावित होण्याची शक्यता काहीवेळा पालक मुलांच्या डोळ्यांत जास्त काजळ घालतात. त्यामुळे बाळाच्या डोळ्यांमधील कॉर्निया खराब होऊ शकतो. कॉर्निया हा अतिशय नाजूक असतो आणि त्यावर काजळ लागल्यास इन्फेक्शन होऊन त्याच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, मोठ्या, टपोऱ्या डोळ्यांपेक्षा तुमच्या मुलाची मजबूत दृष्टी अधिक महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या. डोळ्यांतून पाणी येणं काजळ घातल्यानंतर मुलांच्या डोळ्यांतून पाणी येऊ शकतं. ही एकप्रकारे डोळ्यांची अॅलर्जी असते. त्यामुळे काजळ आणि घाण डोळ्यांच्या कोपऱ्यांभोवती जमा झाल्यावर ती शक्य तितक्या लवकर पुसून टाकायला हवी. डोळ्यांतून पाणी येण्याची समस्या वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.