मुंबई, 13 ऑक्टोबर : महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये ब्रेस्ट कॅन्सर चं प्रमाण मोठं आहे. या कॅन्सरबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं केले जात आहेत. या प्रयत्नात अडथळा आणण्याचं काम काही मेसेज करत असतात. या मेसजमुळे काही गैरसमज निर्माण होतात. ‘काळ्या रंगाची ब्रा घातल्यानं ब्रेस्ट कॅन्सर होतो,’ असाही एक गैरसमज आहे. सोशल मीडियातील काही मेसेजमुळे या गैरसमजात आणखी भर पडली आहे. महिलांच्या मनात यामुळे अनेकदा संभ्रम निर्माण होतो. ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागृती निर्माण करणारा महिना आहे. त्यातच 13 ऑक्टोबर हा दिवस नो ब्रा डे म्हणूनही साजरा केला जातो. या दिवसानिमित्त ‘काळ्या रंगाची ब्रा घातल्यानं ब्रेस्ट कॅन्सर होतो’ या सोशल मीडियावरील प्रचारात किती सत्य आहे? हे आम्ही तज्ज्ञ डॉक्टरकडून जाणून घेतले. काय आहे सत्य? काळा रंग हा उष्णता शोषून घेणारा आहे. या रंगाची ब्रा घातली तर तुमचे स्तर सूर्यकिरणे शोषून घेतात, त्यामुळे तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होतो, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. ‘हा संपूर्ण चुकीचा प्रचार आहे. या प्रचाराला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या प्रकारच्या अफवांना आळा बसणे आवश्यक आहे, असे मत बॉम्बे हॉस्पिटलमधील कॅन्सर स्पेशालिस्ट दीपक निकम यांनी व्यक्त केले आहे. ‘स्तनांच्या पेशींच्या वाढीचे प्रमाण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन या हार्मोन्सवर अवलंबून असते. यामध्ये इस्ट्रोजनच्या हार्मोन्सचं प्रमाण जास्त झाल्यास स्तनाांच्ये पेशीची वाढ होऊन ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो,’ असे निकम यांनी स्पष्ट केले आहे. No Bra Day 2022 : असा दिवस ज्या दिवशी महिला घालत नाहीत ब्रा; पण का? ब्रेस्ट कॅन्सरबाबत समाजात असलेल्या भीतीमध्ये ब्रा घातल्यानं कॅन्सर होतो, असाही एक गैरसमज आहे. पण, ‘ब्रेस्ट कॅन्सर आणि ब्रा वापर यांच्यात काहीही संबंध नाही. हा केवळ एक गैरसमज आहे.’ असं अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनं या विषयावर केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. लठ्ठपणा आणि शरीराचं आरोग्य, आरोग्याचे अन्य घटक ब्रेस्ट कॅन्सर होण्यास कारणीभूत असतात; पण ब्रा वापरल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो हा प्रचार निराधार असल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. काळ्या रंगाची ब्रा वापरल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो हाही एक असाच गैरसमज आहे. त्यामुळे अनेक महिला काळ्या रंगाची वापरणं टाळतात; पण काळ्या रंगाची ब्रा वापरणं आणि ब्रेस्ट कॅन्सर यांचा काहीही संबंध नाही. या सगळ्या अफवा आहेत, असं ब्रेस्ट हेल्थ एज्युकेशन ऑर्गनायझेशनच्या एका रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत्या वयाशी निगडीत आहे. 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. काही अनुवंशिक कारणांमुळेही हा कॅन्सर होतो. कॅन्सर होण्यामागे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा, अल्कोहलचे वाढते सेवन ही देखील कारणं आहेत.