मुंबई, 27 ऑक्टोबर : गेल्या दोन ते अडीच वर्षांत कोरोनाने जगभरातल्या अनेक देशांमध्ये कहर केला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन जारी करण्यात आला. जवळपास सर्वच देशांना लॉकडाउनचा फटका बसला. अजूनही कोरोनाचे नवनवीन व्हॅरिएंट्स आढळून येत आहेत. सध्या संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने भारतासह अनेक देशांमध्ये व्यवहार सुरळीत झाले आहेत; मात्र अजूनही कोरोनाचं संकट पूर्णतः टळलेलं नाही, असं शास्त्रज्ञ वारंवार सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्यावर भर द्यावा, असा सल्ला दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी एका नवीन महामारीचा धोका व्यक्त केला आहे. ही महामारी कोरोनापेक्षा जास्त धोकादायक असेल असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या महामारीमागे पक्षी किंवा वटवाघळासारखे घटक कारणीभूत ठरणार नाहीत, तर बर्फामुळे हे संकट निर्माण होऊ शकतं. व्हायरल स्पिलओव्हरचा धोका वाढल्याने ही महामारी येईल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे व्हायरल स्पिलओव्हर म्हणजे काय ते जाणून घेऊ या. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जग अद्याप कोरोना महामारीतून सावरलेलं नाही. त्यातच शास्त्रज्ञांनी नवीन महामारीसंबंधी सूतोवाच केलं आहे. जगात पुन्हा नवीन महामारी येऊ शकते आणि ती कोरोनापेक्षा जास्त धोकादायक ठरू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ही नवीन महामारी पक्षी किंवा वटवाघळामुळे नाही, तर बर्फाच्या माध्यमातून येऊ शकते. हिमनद्यांमध्ये शेकडो धोकादायक विषाणू आणि जिवाणू असतात. त्यापैकी सर्वांत जास्त संख्या उत्तर ध्रुवाच्या आर्क्टिक तलावांमध्ये आहे, असा दावा प्रोसीडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी बी या बायोलॉजिकल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात केला गेला आहे. `व्हायरल स्पिलओव्हरचा धोका वाढल्याने नवीन महामारी येऊ शकते,` असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. हेही वाचा - काही लोकांना डास जास्त का चावतात? याचा ब्लड ग्रुपशी संबंध आहे का? जाणून घ्या संशोधन अहवालात शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे, की व्हायरल स्पिलओव्हर ही अशी प्रक्रिया आहे, जेव्हा एखादा विषाणू नवीन माध्यमातून पसरू लागतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर वटवाघूळ आणि पक्ष्यांच्या माध्यमातून विषाणू पसरतात. सध्या जगात जितक्या वेगानं बर्फ वितळत आहे, तितकाच नवीन विषाणू पसरण्याचा धोका वाढत आहे. वितळणाऱ्या हिमनद्यांमधून नवीन विषाणू पसरू शकतो. `याबाबतच्या संशोधनासाठी आर्क्टिक परिसर निवडण्यात आला. कारण तिथल्या हिमनद्या जगातल्या अन्य भागांच्या तुलनेत अधिक वेगानं वितळत आहेत. या भागात तापमान तुलनेनं जास्त आहे. त्यामुळे या भागात व्हायरल स्पिलओव्हरचा धोका जास्त आहे. मागच्या वर्षी करण्यात आलेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांना तिबेटच्या हिमनद्यांमध्ये असे 33 विषाणू सापडले होते, जे 15 हजार वर्षांपासून बर्फात दडलेले होते. यातले 28 विषाणू असे होते, की जे यापूर्वी कधीही आढळून आले नव्हते,` असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.
संशोधन अहवालानुसार, हवामान बदलामुळे आर्क्टिक खंडाच्या तापमानात बदल होईल. यामध्ये गोठलेले जिवाणू आणि विषाणू बाहेर पडतील आणि स्वतःसाठी नवीन माध्यम शोधतील. ज्याप्रमाणे कोरोना व्हायरस मानवी शरीरात त्याची संख्या वाढवताना दिसतो. त्याप्रमाणे नवीन जीव किंवा प्राण्यांच्या माध्यमातून हे जीवाणू आणि विषाणू आपली संख्या वाढवू शकतात. अशा रीतीने त्यांचे नवे व्हॅरिएंट समोर येतील. `हवामानबदलाचे दुष्परिणाम वाढत आहेत. यामुळे सातत्याने हिमनद्या वितळत आहेत. यामुळे त्यातले जिवाणू आणि विषाणू समोर येऊ शकतात. यातून नवीन महामारी जन्माला येण्याचा धोका आहे,` असं शास्त्रज्ञांनी सांगितलं. हवामान बदलामुळे विविध प्रजातींच्या जीव-जंतूंमध्ये विषाणूजन्य वाहक बदलत आहेत. अधिक उंचीवर असलेलं आर्क्टिक क्षेत्र नवीन महामारीचं केंद्र बनू शकतं. शास्त्रज्ञांनी विषाणू आणि त्यांचे माध्यम समजून घेण्यासाठी हा अभ्यास केला आहे. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी आर्क्टिक प्रदेशातल्या सर्वांत मोठ्या लेक हॅझेनमधून नमुने घेऊन त्यांची तपासणी केली. तपासणीत सापडलेले डीएनए आणि आरएनए आतापर्यंत सापडलेल्या विषाणूशी जुळले, तेव्हा असं आढळून आलं, की हिमनद्या जितक्या वेगाने वितळतील तितक्या वेगाने त्यातले विषाणू बाहेर येऊन संसर्ग पसरवतील.