डायबेटिसच्या रुग्णांनी ऊसाचा रस प्यावा की नाही? वाचा फायदे अन् तोटे
मुंबई, 1 नोव्हेंबर: बहुतेकांना ऊसाचा रस प्यायला आवडतो. उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी उसाचा रस जास्त प्रमाणात प्यायला जातो. पण ऊसाचा रस रिफ्रेशिंग आणि चविष्ट असण्यासोबत पौष्टिक आणि अँटिऑक्सिडंटयुक्त आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ऊसाचा रस नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारा आहे. यामुळे आरोग्याला खूप फायदे होतात. ऊसाचा रस हा एक नैसर्गिक औषधदेखील मानला जातो. लिव्हर आणि किडनीशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी हा रस उपयुक्त ठरू शकतो. आजकाल जगभरात वेगानं वाढणारे डायबेटिसचे रुग्ण ऊसाचा रस गोड असल्याने तो घ्यावा की नाही, याबाबत संभ्रमात असतात. डायबेटिसचे रुग्ण उसाचा रस पिऊ शकतात का? या विषयी जाणून घेऊया. गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, बैठं काम आणि कमी व्यायामामुळे डायबेटिस, हृदयविकारासारखे गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. योग्य आहार आणि व्यायामाच्या माध्यमातून या आजारांपासून बचाव होऊ शकतो. सर्वसामान्यपणे डायबेटिसच्या रुग्णांसाठी आहार हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण आहाराचा थेट परिणाम ब्लड शुगर लेव्हलवर होत असतो. डायबेटिसचं निदान झाल्यावर रुग्ण गोड, साखरयुक्त आणि कर्बोदकांचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाणं वर्ज्य करतात. अशावेळी कोणती फळं खावी, ज्युस प्यावा की नाही, असे प्रश्न त्यांना पडतात. हा प्रश्न उसाच्या रसाबाबतीतदेखील असतो. **हेही वाचा:** Heart Attack : शरीराच्या ‘या’ भागातून घाम येणं धोक्याची घंटा, येऊ शकतो हार्ट अटॅक उसाच्या रसाचं पौष्टिक मूल्य- ऊसापासून काढलेला आणि फिल्टर न केलेला रस अनेक ठिकाणी रम, दारू, गूळ आणि ब्राउन शुगर तयार करण्यासाठी वापरला जातो. उसाच्या रसात पूर्णपणे साखर नसते. त्यात 75 टक्के पाणी आणि सुमारे 15 टक्के फायबर असतं. प्रक्रिया न केलेल्या उसाच्या रसात फिनोलिक आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. हे घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. उसाच्या रसामुळे शरीरातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्सचं प्रमाण वाढतं.
डायबेटिसचे रुग्ण उसाचा रस पिऊ शकतात का?- ऊसाचा रस गोड असतो. यात साखरेचं प्रमाण जास्त असतं. `हेल्थलाइन डॉट कॉम`ने दिलेल्या माहितीनुसार, इतर सर्व साखरयुक्त पेयांप्रमाणे ऊसाचा रसदेखील डायबेटिसच्या रुग्णांसाठी अत्यंत नुकसानदायक ठरू शकतो. ऊसाचा रस प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढण्याची शक्यता असते. तज्ज्ञ आणि अनेक लॅब टेस्टनंतर डॉक्टर डायबेटिसच्या रुग्णांना उसाचा रस पिण्याची अजिबात शिफारस करत नाहीत. त्यांनी ऊसाचा रस प्यायला तर शरीरातील पॉलीफेनॉल अँटिऑक्सिडंट्स बाहेर पडतात. त्यामुळे पॅनक्रियामधून अधिक इन्शुलिन तयार होऊ शकतं. ऊसाचा रस पिण्याऐवजी तुम्ही अन्य कोणत्याही ताज्या फळाचा ज्युस, शुगर फ्री चहा किंवा कॉफी डायबेटिस पेशंट्सनी प्यावा. या पेयांमुळे ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही.