मुंबई, 21 मे : एकीकडे कोरोना संसर्गाचे (Corona Virus) संकट असताना, दुसरीकडे नव्या बुरशीजन्य आजाराचे संकट गंभीर स्वरुप धारण करीत आहे. अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजेच काळ्या बुरशीचा (Black Fungus) संसर्ग झालेले रुग्ण वाढत असल्याने केंद्र सरकारने या राज्यांना याला महामारी (Pandemic) घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. या संसर्गाचा कहर कमी होण्यास अद्याप सुरुवात देखील झालेली नाही, तोच अचानक व्हाईट फंगस म्हणजे पांढऱ्या बुरशीची (White Fungus) लागण रुग्णांना होत असल्याचे समोर आलं आहे. वैज्ञानिकांच्या मते ब्लॅक फंगसपेक्षाही हा संसर्ग जास्त धोकादायक असून तो फुफ्फुसं (Lungs) तसेच मेंदूवर (Brain) परिणाम करतो. जवळपास संपूर्ण शरीरावर होतो परिणाम मेडिकल परिभाषेत याला कॅंडिडा (Candida) असं संबोधलं जातं. हा व्हाईट फंगस रक्तावाटे शरीरात प्रवेश करुन सर्वच अवयवांवर परिणाम करतो. नखं, त्वचा, पोट, किडनी, ब्रेन, जननेंद्रीय आणि तोंड तसेच फुफ्फुसांवर या फंगसचा परिणाम होतो. विशेष म्हणजे या आजाराचे रुग्ण कोरोनाग्रस्त आहेतच असे नाही. परंतु, या फंगसचा परिणाम फुफ्फुसांवर होत असल्यानं याची श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत वेदना आदी लक्षणं कोरोनाशी मिळतीजुळती आहेत. या व्यतिरिक्त दुसरी देखील लक्षणे दिसत आहेत याच्या संसर्गामुळे शरीरातील जॉईंटसवर (Joints) परिणाम झाला तर ते दुखू लागतात. ही बुरशी मेंदू पर्यंत पोहोचली तर विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. तसेच यामुळे रुग्ण लवकर कोणताही निर्णय घेऊ शकत नाही आणि त्याला बोलण्यास देखील त्रास होतो. या व्यतिरिक्त रुग्णाला तीव्र डोकेदुखी आणि उलट्यांचाही त्रास होऊ शकतो. त्वचेखाली रक्ताच्या माध्यमातून संसर्ग झाल्याने छोटे छोटे फोड येऊ लागतात मात्र ते वेदनारहित असतात. ही सर्व संसर्गाची सुरुवातीची लक्षणे आहेत. तेव्हा वाढतो धोका पांढऱ्या बुरशीचा परिणाम थेट फुफ्फुसांवर होत असल्याने रुग्णला कोरोनाच झालाय, असं समजून तपासणी न करता घरीच उपचार घेऊ लागतो, त्यामुळे त्याची तब्येत बिघडते. शरीरातील प्रमुख अवयवांना संसर्ग होऊ लागतो, यामुळे ऑर्गन फेल (Organ Fail) होऊन रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. इतका धोकादायक हा फंगस नेमका असतो तरी कसा? ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती (Immune Power) कमजोर असते, अशा व्यक्ती जर दुषित पाणी किंवा संसर्गजन्य वनस्पतींच्या संपर्कात आल्या, तर त्यांना संसर्गाचा धोका असतो. या व्यतिरिक्त कोरोना चे गंभीर रुग्ण, ज्यांना ऑक्सिजन पुरवठा केला जातोय, असे रुग्ण ऑक्सिजनची उपकरणे खराब असल्यास देखील या संसर्गाला बळी पडतात. जे लोक दीर्घकाळापासून स्टेरॉईडचे सेवन करीत आहेत, किंवा ज्यांना डायबेटिज आहे, अशा लोकांना या पांढऱ्या बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. महिलांमध्ये ल्युकेरियाच्या रुपात दिसतो संसर्ग या फंगसचा धोका महिलांना अधिक असतो. हा संसर्ग महिलांमध्ये ल्युकेरिया (Lukeria) म्हणजेच पांढऱ्या स्त्रावाच्या रुपात दिसून येतो. कॅन्सर रुग्णांना देखील याचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. मात्र कोरोना सारखी लक्षणे दिसत असल्याने रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट **(RT PCR)**करुन घेतात. पण या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह येतो. तेव्हा तज्ज्ञ रुग्णांना एचआरसीटी **(HRCT)**चाचणी करुन घेण्यास सांगतात. यावेळी फुफ्फुसात गोळ्यासारखा याचा संसर्ग दिसून येतो, परंतु कोरोनापेक्षा तो भिन्न असतो. तेव्हा रुग्णाची बलगम कल्चर टेस्ट केली जाते. या टेस्टमधून संसर्गाबाबत दुजोरा मिळतो. असे केले जातात उपचार अॅण्टी-फंगल (Anti-Fungal) औषधांच्या आधारे या उपचारांना सुरुवात होते. जर हा आजार सुरुवातीच्या काळात लक्षात आला, तर या औषधांचा असर योग्य प्रकारे होतो. आजाराचे उशीरा निदान झाल्यास रुग्णांची स्थिती गंभीर बनू शकते. अशा वेळी स्थितीनुसार उपचार केले जातात. **ब्लॅक फंगस (**Black Fungus)म्हणजे काय? अनेक राज्यांमध्ये या आजाराला महामारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर आहे, त्यांनाच प्रामुख्याने या आजाराचा संसर्ग होतो. सध्या कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाल्याने या आजाराचा संसर्ग वेगाने होत असल्याचे दिसत आहे. यापूर्वी केमोथेरपी घेतलेले रुग्ण, अनियंत्रित शुगर असलेले रुग्ण, ऑर्गन ट्रान्सप्लान्ट (Organ Transplant) झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार होत असल्याचे दिसून येत होते. कसा होतो संसर्ग? हा आजार म्युकरमायकॉसिस (Mucormycosis) या बुरशीमुळे होतो. ही बुरशी नाकावाटे संपूर्ण शरीरात पसरते. ही बुरशी हवेत असते आणि नाकातून शरीरात पसरते. शरीराच्या कोणत्याही भागाला कापले किंवा भाजले असेल तर त्यातूनही ही बुरशी शरीरात प्रवेश करते. नाक जरी बुरशीचे प्रवेशव्दार असले तरी शरीराच्या कोणत्याही भागातून याचा संसर्ग होऊ शकतो. ही आहेत प्रमुख लक्षणं डोकेदुखी, नाक बंद होणे, डोळे लाल होऊन सुजणे आदी लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा संसर्ग एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीला किंवा जनावरांमुळे होत नाही, तर बुरशीच्या थेट संपर्कात आल्यास होतो.