मुंबई, 17 जानेवारी : फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2006 हा किताब जिंकणारी सुपर मॉडेल नताशा सूरी हिनं एका व्यक्तीच्या विरोधात सायबर हरॅसमेंटची एफआयआर दाखल केली आहे. एक व्यक्ती मागच्या काही काळापासून तिला त्रास देत असून तो सतत अश्लील फोटोंवर तिला टॅग करत असल्याचं नताशाचं म्हणणं आहे. नताशानं तिच्या तक्रारीत म्हटल्यानुसार एक माणूस मागच्या दोन-अडीच महिन्यांपासून अश्लील वेबसाइटवर ब्लर अश्लील फोटोंवर नताशाच्या नावाचा वापर करत होता. एवढंच नाही तर या व्यक्तीनं अशी अफवा सुद्धा पसरवली होती की, नताशानं बिग बॉस स्पर्धक सिद्धार्थ शुक्लावर हरॅसमेंटचा आरोप लावला आहे. मात्र हे सर्व पूर्णतः खोटं होतं. हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार नाताशानं मुंबईच्या दादर पोलिस स्टेशनमध्ये या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार फ्लिन रेमेडियोज नावाचा एक व्यक्ती नताशाच्या नावानं लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत होता. मागच्या काही महिन्यांपासून तो नताशाला ब्लर अश्लील फोटो किंवा अशा न्यूड फोटोंवर टॅग करत होता. ज्यात ती नाहीच आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्याची सुरुवात नोव्हेंबर 2019 मध्ये एका आर्टिकलमध्ये प्रकाशित झालेल्या फोटोपासून झाली. या आर्टिकलमध्ये बाथरुममध्ये बंद असलेल्या एका मुलीचा ब्लर फोटो होता. फ्लिननं या फोटोवर नाताशा टॅग केलं होतं.
नताशा सूरीचे वकील माधव थोराट यांचं म्हणणं आहे की, मागच्या वर्षी डिसेंबर 24 ला या सर्व प्रकरणाची माहिती सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन सेलला देण्यात आली होती. मात्र हा प्रकार दिवसेंदिवस वाढत गेला. त्यामुळे आता नताशाला याबाबत पोलिसात धाव घ्यावी लागली. न्यूज एजन्सी IANS शी बोलताना नाताशा म्हणाली, या माणसानं अगोदर नताशा सूरी सिंह नावाचं एक ट्विटर हॅन्डल तयार केलं होतं. त्यानंतर ते बऱ्याच अश्लील फोटोंवर मला टॅग करु लागला. नताशा सूरी सिंह अशी कोणीही व्यक्ती नाही. पण हा माणूस मला जाणून-बुजून त्रास देत आहे.