इस्माईल श्रॉफ
मुंबई, 27 ऑक्टोबर- बॉलिवूड मधील दिग्गज दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचं बुधवारी रात्री उशिरा निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इस्माईल यांनी ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘बुलंदी’, ‘थोडी सी बेवफाई’, ‘सूर्या’ यासह अनेक सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. ते मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी होते. इस्माईल यांना त्यांच्या ‘थोडी सी बेवफाई’ या सुपरहिट चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली होती. विशेष म्हणजे हा त्यांचा डेब्यू चित्रपट होता. इस्माईल श्रॉफ दिग्दर्शित आणि सुपरस्टार राजेश खन्ना, शबाना आझमी आणि पद्मिनी कोल्हापुरे अभिनीत ‘थोडी सी बेवफाई’ हा चित्रपट 1980 च्या दशकात प्रचंड गाजला होता. हा चित्रपट इस्माईल यांचा भाऊ मोईनुद्दीन यांनी लिहिला होता. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राज कुमार यांच्यासोबत चार चित्रपट करणारे इस्माईल हे एकमेव चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांच्यासोबत काम करणं सोपं नव्हतं. परंतु त्याकाळात दिग्दर्शक इस्माईल यांनी हे धाडस दाखवलं होतं. ईटाईम्सच्या वृत्तानुसार, गीतकार समीर यांच्याशी संपर्क साधला असता, इस्माईल अनेक वर्षांपासून आरोग्याच्या विविध समस्यांनी त्रस्त होते असं समजलं. दरम्यान, चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांनी सांगितलं की, त्यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी इस्माईल श्रॉफ यांच्यासोबत ‘थोडी सी बेवफाई’ आणि ‘आहिस्ता आहिस्ता’मध्ये काम केलं होतं. इस्माईल यांच्या मृत्यूवर त्यांनीसुद्धा शोक व्यक्त केला आहे. **(हे वाचा:** Sidhu Moosewala मर्डर केसमध्ये मोठा ट्विस्ट! पंजाबी सिंगर अफसाना खानची NIAकडून 5 तास चौकशी ) शोक व्यक्त करत पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या, “आहिस्ता आहिस्ता माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. त्यांच्या वागण्यातून ते कडक दिसत होतेपरंतु त्यांचा चेहरा हसरा होता. त्यांना नेमकं काय हवंय यावर त्यांचा खूप विश्वास होता आणि ते ते प्रत्यक्षात आणायचे. अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून आमचं खूप चांगलं नातं होतं. ते अतिशय संवेदनशील दिग्दर्शक होते. हे इंडस्ट्रीचं खूप मोठं नुकसान आहे. त्यांनी इंडस्ट्रीत आपली वेगळी छाप सोडली आहे." गेल्या काही महिन्यांपासून आजारी- मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांना 29 ऑगस्ट रोजी ब्रेन स्ट्रोक आला होता. ज्यामुळे त्यांच्या शरीराच्या उजव्या बाजूला लकवा मारला होता. त्यामुळे त्यांना चालत-फिरता येत नव्हतं. तेव्हापासून ते झोपून होते. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील प्रसिद्ध कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होतं. अवघ्या काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णलयातून घरी आणण्यात आलं होतं. परंतु बुधवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली. ते चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णलयात हालवण्यात आलं. परंतु रुग्णालयात त्यांचं निधन झालं.