रितेश देशमुख
मुंबई, 25 डिसेंबर : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीवर छाप सोडणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे रितेश देशमुख . रितेश देशमुख लवकरच ‘वेड’ या मराठी चित्रपटात दिसणार असून सध्या तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ आहे. रितेशसोबत या चित्रपटात त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीयाही दिसणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा यांचा ‘वेड’ लवकरच प्रेक्षकांना वेड लावायला येत आहे. अशातच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रितेश देशमुखच्या मीडिया ऑर्गनायझरकडून कोल्हापूरात पत्रकारांसोबत गैरवागणुक झाल्याचं समोर आलं आहे. घडलेल्या गैरप्रकारावर रितेशने मीडियासमोर माफी मागितली आहे. रितेश देशमुख यांच्या मीडिया ऑर्गनायझरकडून कोल्हापूरात पत्रकारांना हीन दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनानंतर रितेश जिनिलीया माध्यमांशी बोलत असताना काही पत्रकारांनी त्याच्याकडे नाराजी व्यक्त केली. एका पत्रकाराने नाराजी व्यक्त करत म्हटलं की, ‘आम्हाला निमंत्रण नव्हतं हे मान्य, पण आम्हाला कल्पना नव्हती की निवडक लोक आहेत की सगळ्यांना बोलू दिलं जाणार, पण आमच्या पाठी बाऊन्सर लावून हॉटेलमधून हाकललं. आमचा अवमान झालाय. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचवणं गरजेचं होतं.’ हेही वाचा - Main Atal Hoon : पंतप्रधान, कवी राजकारणी, मैं अटल हूं मधील पंकज त्रिपाठीचा पहिला लुक समोर, ओळखणंही झालं कठिण पत्रकाराच्या नाराजीवर रितेश देशमुखने त्यांची माफी मागितली, रितेश म्हणाला, तुम्हाला असं काही वाटत असेल आमच्याकडून तुमचा अवमान झालाय तर मी माफी मागतो. कोणाशी भेटणार हे मी काही ऑर्गनाईज केलं नव्हतं. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात त्यामुळे मी तुमची माफी मागतो.’ रितेश पुढे म्हणाला, मी इथे चित्रपटासाठी, किंवा प्रमोशनसाठी आलेलो नाहीये. माझ्या लग्नाला 11 वर्षे झाली पण आम्ही सोबत दर्शनाला आलो नव्हतो. त्यामुळे आम्ही दर्शनासाठी आलोय. ही काही जागा नाहीये चित्रपटाविषयी बोलण्याची. तुमच्यावर महालक्ष्मीचा आशिर्वाद असावा हिच लक्ष्मीचरणी प्रार्थना.
दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा यांचा ‘वेड’ चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा अपूर्ण राहिलेल्या प्रेमाभोवती फिरते. या चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं.