मुंबई, 13 फेब्रुवारी : सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. सगळीकडे प्रेमाचा वर्षाव होताना दिसत आहे. आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करत आजन्म एकत्र राहण्याच्या आणाभाकाही अनेकजण घेत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशी एक लव्हस्टोरी सांगणार आहोत जी वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ही लव्हस्टोरी आहे शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांची. जावेद अख्तर यांच्याविषयी वाटणाऱ्या जवळीकीमुळे शबाना यांना घरच्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. आधीच लग्न झालेल्या जावेदसोबत लग्न लावून द्यायला शबानाच्या घरचे संमती देत नव्हते. जावेद अख्तर यांचं पहिलं लग्न हनी यांच्याशी झालं होतं. हनी या जावेदपेक्षा १० वर्षांनी लहान आहेत. जावेद आणि हनी यांना झोया आणि फरहान अख्तर ही दोन मुलंही आहेत. १९७० मध्ये जावेद कैफी आझमी यांच्याकडे लिखाण शिकायला जायचे. याचवेळी त्यांची ओळख शबाना यांच्याशी झाली. कळत- नकळत त्यांच्यात जवळीक वाढत गेली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मीडियामध्येही त्यांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या. याच चर्चांमुळे हनी आणि जावेद यांच्यामध्ये दररोज भांडणं होऊ लागली होती. अखेर जावेद यांनी शबानाशी लग्न करण्याचा विचार करत हनीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.
एकीकडे जावेद शबानाशी लग्नासाठी तयार होते तर दुसरीकडे शबानाच्या वडिलांना हे लग्न अजिबात मान्य नव्हतं. आपल्या मुलीमुळे जावेद आणि हनी यांच्यात दुरावा आला असं कैफी आझमी यांना वाटत होतं. तसेच शबानाने एका विवाहीत पुरुषाशी लग्न करू नये असंच त्यांना वाटत होतं. अखेर शबाना यांनी वडिलांना पटवून दिलं की जावेद आणि हनी यांचं लग्न तिच्यामुळे तुटलं नाही. अखेर मुलीच्या हट्टासमोर बापाने हात टेकले आणि लग्नाला मान्यता दिली. शबाना आझमी 1975 मध्ये अंकुर, 1983 मध्ये अर्थ, 1984मध्ये खंडर 1985मध्ये पार आणि 1999मध्ये गॉडफादर या सिनेमासाठी आतापर्यंत पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तर त्यांनी पाच फिल्मफेअर पुरस्कारांवरही आपलं नाव कोरलं आहे. सिनेसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं आहे.