मुंबई, 25 जुलै : ‘सूर नवा ध्यास नवा’ या कलर्स मराठीवर दाखवण्यात येणाऱ्या सिंगिंग रिअॅलिटी शोचं दुसरं पर्व लवकरच सुरू होतंय. यावेळी मात्र यात एकमेव बदल करण्यात येणार आहे. यावेळी सूत्रसंचालनाची जबाबदारी तेजश्री प्रधानऐवजी स्पृहा जोशी सांभाळताना दिसेल. सूर नवाच्या नव्या सीझनमध्ये छोटे स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झालेले दिसतील. तर परीक्षणाची जबाबदारी पुन्हा एकदा अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे यांच्या खांद्यावर असेल. ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी या कार्यक्रमात आपले टॅलेंट दाखवणार आहेत. स्पृहा जोशी मराठी घरांमधलं आवडतं व्यक्तिमत्त्व. समुद्र, डोण्ट वरी बी हॅपी या नाटकांतून तिचं अभिनय कौशल्य तर पाहिलंच. पण छोट्या पडद्यावरही स्पृहा नेहमीच लोभस व्यक्तिमत्त्व ठरली. एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेतली उमेश कामतसोबतची तिची केमिस्ट्री चांगलीच रंगली होती. ‘किचनची सुपरस्टार’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही तिने केले होते. हेही वाचा
तेजश्री प्रधानही छोट्या पडद्यामुळे घराघरात पोचली. पडद्यावरची ही ‘सूनबाई’ मग शोचं अँकरिंग करायला लागली. आता तेजश्रीच्या जागी स्पृहाला का घेतायत, हे नक्की कळलं नाहीय. पण स्पृहा आणि छोट्या मंडळींचं एक वेगळं नातं निर्माण होऊ शकतं, असं वाटतंय. हृषिकेश जोशीचा होम स्वीट होम सिनेमातही स्पृहा काम करतेय. अभिनेता हृषिकेश जोशी आता दिग्दर्शनात पदार्पण करतोय. होम स्वीट होम हा त्याचा पहिला दिग्दर्शित केलेला सिनेमा येत्या 28 सप्टेंबरला भेटीला येतोय. विशेष म्हणजे यात दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांनीही काम केलंय.त्यामुळे रिमाजींच्या चाहत्यांना त्यांना मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहता येईल. यासोबत मोहन जोशी, स्पृहा जोशी आणि हृषिकेश स्वत: यात काम करत आहे.