Cricketers in Movies : काही क्रिकेटपटू असेही आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. यामध्ये अनुभवी क्रिकेटर्स सुनील गावस्कर, अनिल कुंबळे आणि युवराज सिंह यांचा समावेश आहे.
बॉलिवूड आणि क्रिकेटचं एक वेगळंच नातं आहे. असे अनेक क्रिकेटर्स आहेत जे अभिनेत्रींच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांच्यासोबत संसार थाटला. तर काही क्रिकेटपटू असेही आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. यामध्ये अनुभवी क्रिकेटर्स सुनील गावस्कर, अनिल कुंबळे आणि युवराज सिंह यांचा समावेश आहे.
भारतासाठी एक कसोटी आणि 20 वन डे सामने खेळणाऱ्या सलील अंकोला यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरसोबत त्यांनी 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं. परंतु त्या सामन्यात त्यांनी केवळ 6 धावा काढल्या होत्या. आणि 2 विकेट घेतल्या होत्या.सलील अंकोला यांनी 'कुरुक्षेत्र', 'पिता' आणि 'चूरा लिया है तुमने' या हिंदी चित्रपटात काम केले आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्येही ते झळकले आहेत.
भारताच्या महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेले अनिल कुंबळेसुद्धा एका हिंदी चित्रपटात दिसले आहेत. भारताचे माजी प्रशिक्षक कुंबळे अनुपम खेर आणि मंदिरा बेदी यांच्या 2008 मध्ये आलेल्या मीराबाई नॉट आउट या चित्रपटात दिसले होते.
ऑलराऊंडर क्रिकेटर युवराज सिंहसुद्धा चित्रपटात झळकला आहे. परंतु त्यावेळी तो केवळ 11 वर्षांचा होता. त्याने एका पंजाबी चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती.
भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक आणि माजी प्रशिक्षक संदीप पाटील यांनीही हिंदी चित्रपटांमध्ये नशीब आजमावलं आहे. 'कभी अजनबी थे' या चित्रपटात त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लनसोबत काम केलं आहे.
दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनीही एका मराठी चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटाचं नाव होतं 'सावली प्रेमाची'. याशिवाय नसीरुद्दीन शाह स्टारर 'मालामाल' या हिंदी चित्रपटातही ते पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले होते.