मुंबई, 26 ऑगस्ट- हरियाणाच्या भाजप नेत्या आणि बिग बॉस फेम सोनाली फोगट यांचं गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली असून सोनाली यांचा मृत्यू संशयास्पद असून यामागे मोठ कटकारस्थान असल्याचा दावा सोनालीच्या भावानं केला होता. या प्रकरणी सोनालीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता पिंकव्हीलाच्या रिपोर्टनुसार, गोवा पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. सोनाली फोगाटचा भाऊ रिंकूने आपल्या बहिणीचा खून झाल्याचा आरोप केला होता. तिच्या जेवणात काहीतरी मिसळले होते. ते खाल्ल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर गोवा पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आरोप रिंकूने केला आहे. रिंकूच्या मते, सोनालीच्या मृतदेहाचं दिल्ली किंवा जयपूरमध्ये पोस्टमॉर्टम व्हावं अशी त्याची इच्छा होती. कारण त्यांचे कुटुंबीय गोव्यात झालेल्या तपासावर समाधानी नाहीत. तर गोवा पोलिसांनी सांगितलं होतं की, आतापर्यंतच्या तपासात काहीही संशयास्पद आढळलं नाही. परंतु त्यानंतर, सोनाली फोगाटच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या शरिरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये झालेल्या या धक्कादायक खुलास्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सोनाली यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात पाठवण्यात आला होता.सोबतच या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनंतर आता गोवा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचं समोर आलं आहे. (हे वाचा: Sonali Phogat: सोनालीच्या मृत्यूनंतर अशी झालीये लेकीची अवस्था; रडून-रडून आईसाठी मागतेय न्याय ) सोनालीच्या भावाचा खळबळजनक दावा- सोनाली यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी बहिणीच्या मृत्यूसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सोनालीच्या भावानं सांगितलं, ‘सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांनी मिळून माझ्या बहिणीला जाळ्यात अडकवलं. सुखविंदरने तीन वर्षांपूर्वी सोनालीच्या जेवणात अंमली पदार्थ मिसळून तिच्यावर बलात्कार केला होता आणि त्याचा व्हिडिओही बनवला होता. त्यानंतर सुधीर आणि त्याचा मित्र सुखविंदर सातत्यानं सोनालीला ब्लॅकमेल करत होते. हे दोघं अधूनमधून सोनालीच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळत होते. त्यामुळे अनेकदा तिची प्रकृती बिघडली होती. शेवटी या दोघांनी मिळून कट करत गोव्यात नेऊन तिची हत्या केली’.