मुंबई, 27 जानेवारी- पंजाबी गायिका आणि बिग बॉस (Bigg Boss 13) स्पर्धक शेहनाज गिल (Shehnaaz Gill) आज आपला 29 वा वाढदिवस (29th Birthday Today) साजरा करत आहे. या खास क्षणाला अभिनेत्रीचे काही जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ती दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत वाढदिवस साजरा करताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे व्हिडीओ (Throwback Video) पाहून चाहते भावुक होत आहेत. शेहनाज गिल आज 29 वर्षांची झाली आहे.सोशल मीडियावर चाहते शेहनाज गिलवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान अभिनेत्रीच्या 27 व्या वाढदिवसाचे काही जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये शेहनाज सिद्धार्थ शुक्लासोबत आपला वाढदिवस साजरा करत आहे. सोबतच त्यांचं संपूर्ण कुटुंबसुद्धा आहे. हा व्हिडीओ पाहून सिडनाजचे चाहते फारच भावुक होत आहेत. सिद्धार्थ गेल्यानंतर शेहनाजचा हा पहिलाच वाढदिवस आहे.त्यामुळे हे जुने व्हिडीओ तिच्यासाठीही फारच खास आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शेहनाज गिल आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसून येत आहे. सोबतच सिद्धार्थसुद्धा यामध्ये आहे. हा व्हिडीओ शेहनाजच्या 27 व्या वाढदिवसाचा आहे. व्हिडीओ पाहून तो फारच मजेशीर असल्याचं दिसत आहे. कारण यामध्ये सिद्धार्थ आणि तिच्या भावाने तिला उचलून धरलं आहे. ते तिला स्विमिंगपूलमध्ये टाकून मजेशीर शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. सिद्धार्थ सोबतच संपूर्ण कुटुंब काऊंटिंग करताना दिसून येत आहे. त्यावेळी शेहनाजचा 27 वा वाढदिवस होता त्यामुळे 27 पर्यंत काऊंटिंग करून तिला पूलमध्ये टाकण्यात आलं होतं. यामध्ये शेहनाज आणि सिद्धार्थ फारच आनंदी दिसून येत आहेत.
शेहनाज आणि सिद्धार्थ यांची पहिली भेट ‘बिग बॉस 13’ मध्ये झाली होती. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना फारच पसंत पडली होती. शेहनाजच्या साध्या आणि तितक्याच मजेशीर स्वभावाने प्रेक्षकांना भुरळ पडली होती. शेहनाज बिग बॉसच्या घरात अनेक मजेशीर गोष्टी करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. यावेळीच सिद्धार्थ आणि शेहनाजमध्ये जवळीकता निर्माण झाली होती. त्यांनी अनेकवेळा आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. शिवाय ते बिग बॉसच्या घरामध्ये नेहमीच एकेमकांसाठी लढतानासुद्धा दिसले आहेत.