मुंबई, 29 डिसेंबर : अभिनेता कुशल पंजाबीच्या निधनानं टीव्ही इंडस्ट्री ते सामान्य व्यक्ती पर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. वैवाहिक कलहामुळे नैराश्यात अडकलेल्या कुशलनं वयाच्या 37 व्या वर्षी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यानं लिहिलेल्या नोटमध्ये माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार ठरवू नये असं लिहिलं असलं तरीही त्याचा मित्र चेतन हंसराजनं दिलेल्या माहिती नुसार त्याचे त्याच्या पत्नीसोबतचे संबंध बिघडले होते त्यामुळे तो खूप निराश होता. पण आता मात्र यापेक्षा वेगळी माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी कुशलनं त्याची पत्नी आणि मुलाची भेट घेतली होती. स्पॉटबॉय-ईनं दिलेल्या वृत्तानुसार कुशल आणि त्याच्या पत्नीमध्ये मागच्या काही काळापासून वाद सुरू होते त्यामुळे हे दोघंही वेगवेगळे राहत होते. पण दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी नात्यातला दुरावा दूर करण्यासाठी कुशल त्याची पत्नी आणि मुलाला भेटण्याला शंघाई येथे गेला होता. सूत्रांच्या माहितीनुसार कुशल त्याच्या पत्नीशी बोलण्यासाठी आणि त्याच्या नात्याला एक संधी देण्यासाठी शंघाईला गेला होता. मात्र त्याच्या पत्नीनं त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. कुशलनं ही गोष्ट त्याच्या मित्रांपासून लपवली होती. त्यानं फक्त मुलगा कियानला भेटायला गेल्याचं मित्रांना सांगितलं होतं.
कुशलची एक्स गर्लफ्रेंड मेघना नायडू हिनं सांगितलं, ‘मला हे ऐकून खूपच मोठा धक्का बसला कारण तो असं काही करेल असं कदीच वाटलं नव्हतं. मला त्याचं कुटुंब आणि मुलासाठी खूप वाईट वाटतं. या कठीण परिस्थितीशी सामना करण्याची ताकद देव त्यांना देवो एवढीच आशा मी व्यक्त करेन.’ जेव्हा मेघनाला विचारण्यात आलं की, ‘2010 मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर ती त्याला कधी भेटली होती. यावर उत्तर देताना मेघना म्हणाली, 10 पेक्षा जास्त वर्षांच्या काळात आम्ही एकमेकांना भेटलेलो नाही. त्यामुळे मला आठवतही नाही की त्याला शेवटची कधी भेटले होते. पण ज्याप्रकारे त्यानं स्वतःचं जीवन संपवलं त्यामुळे खूप दुःखी आहे. मला या गोष्टीचं दुःख जास्त आहे की मानसिक ताणावामुळे माणूस कशाप्रकारे आपलं जीवन संपवू शकतो.’
कुशल टंडन पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, मी त्याचा फार जवळचा मित्र नाही. पण त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी एक दिवस अगोदरच मी त्याला एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो होतो. जेव्हा मी त्याच्या आत्महत्येबद्दल ऐकलं तेव्हा मी खूप हैराण झालो. त्यानं निराशेमुळे एवढं टोकाचं पाऊल का उचलावं हे मला अजूनही समजत नाही आहे. त्यानं असं करायला नको होतं. त्याचे आई-वडील ही गोष्ट मानायला तयार नाही ते फक्त रडत आहेत.