रश्मिका मंदाना
मुंबई, 28 डिसेंबर : नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना . रश्मिका कायमच तिच्या हटके अंदाजामुळे आणि अनोख्या स्टाईलमुळे चर्चेत असते. तिचा कुठलाही फोटो असो किंवा व्हिडीओ तो काही क्षणातच सोशल मीडियावर ट्रेंड करताना पहायला मिळतो. रश्मिरा सध्या साऊथसोबत बॉलिवूडमध्येही खूप सक्रिय झालेली पहायला मिळतेय. अशातच रश्मिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या कृतीवर चाहते तिचं कौतुक करताना दिसत आहे. 24 डिसेंबर रोजी नेहरू इनडोअर स्टेडियम, चेन्नई येथे ‘वारीसू’चा ऑडिओ लॉन्च कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमानंतर रश्मिका कारमध्ये बसून हॉटेलकडे निघाली. यादरम्यान काही चाहते तिला फॉलो करत होते. याचाच व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, चाहते रश्मिकाच्या गाडीचा पाठलाग करत आहे तेवढ्यात रश्मिकानं अचानक गाडी थांबवते. रश्मिकाने गाडीची काच खाली करत चाहत्याला हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला. चाहत्याने हेल्मेट घालण्याचे आश्वासन दिले, परंतु रश्मिकाने त्याला ताबडतोब हेल्मेट घालण्यास सांगितले. रश्मिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
रश्मिकाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच तिच्या कृतीचं कौैतुक होत आहे. अनेकांनी रश्मिकावर का प्रेम करु नये असं म्हटलं आहे. तर काही जण म्हणाले अशा व्यक्तीला कोणी हेट कसं काय करु शकतं. रश्मिका सध्या या व्हिडीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. चाहतेही या व्हिडीओला भरभरुन पसंती देत आहेत.
दरम्यान, रश्मिका मंदाना सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर मिशन मजनू, रणबीर कपूर स्टारर अॅनिमल आणि अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा 2 मध्ये दिसणार आहे. अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने गुडबाय या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता सारखे दिग्गज कलाकार होते. रश्मिकाचा चाहतावर्ग मोठा असून तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.