आपल्या रोजच्या धावपळीच्या आणि जबाबदारीच्या कामातून वेळ काढून पंजाबमधील IAS अधिकारी राखी गुप्ता यांनी स्वतःचा दुसरा अल्बम नुकताच रिलीज केला आहे. टी सीरिजनं यूट्यूबवर प्रसारित केलेल्या या व्हिडिओत राखी गुप्ता यांनी गायलेलं ‘ऐसो मन होये’ हे गाणं चांगलंच लोकप्रिय होत आहे.
राखी गुप्ता या 1997 बॅचच्या सनदी अधिकारी असून यापूर्वीदेखील त्यांच्या गाण्याचा एक अल्बम बाजारात आला होता. सध्या त्या पंजाबच्या निवासी आयुक्त म्हणून दिल्लीत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आपल्या धडाकेबाज कामासोबत त्यांनी गायनाचा छंददेखील जोपासला आहे.
राधा आणि कृष्ण यांची आपण एकत्र पूजा करतो. त्यांना एकमेकांपासून वेगळं करताच येत नाही, असं राखी गुप्ता सांगतात. गाण्यातून आपण आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात जर ते गाणं परमेश्वराचं असेल, तर मग तर विचारायलाच नको, असं त्या म्हणतात.
याच महिन्यात आलेल्या श्रीकृष्ण जन्मसोहळ्याचं औचित्य साधत हा अल्बम रिलिज करण्यात आला आहे. वृंदावन, इस्कॉन टेम्पल अशा वेगवेगळ्या मनोहारी ठिकाणी या अल्बमचं शूटिंग करण्यात आलं आहे.
कृष्णाच्या बाललीला हा आपला आवडता प्रकार असून प्रत्येक लहान मुलासोबत खेळताना त्यात आपल्याला कृष्णाचं रुप दिसत असल्याचं राखी सांगतात.