Take Care Good Night Movie Review: ही तर तुमची आमचीच कथा

११० मिनिटांच्या या सिनेमात लेखकाला काय सांगायचे आहे ते कळून येते

Madhura Nerurkar
मराठी सिनेमांमध्ये नेहमीच नाविन्यपूर्ण विषय हाताळले जातात. टेक केअर गुड नाईट हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. काळ बदलत जातो तसा सिनेमाचा विषयही बदलत जातो. असे असले तरी खुर्चीला खिळवून ठेवणारे सिनेमे मराठीमध्ये फार कमीच होतात. कदाचित हीच उणीव भरून काढण्यासाठी महेश मांजरेकर यांनी टेक केअर गुड नाईटची निर्मिती केली असेल.मराठी प्रेक्षक हा आजही आशयघन सिनेमांना प्राधान्य देतो. त्यामुळे सिनेमात किती नावाजलेले कलाकार आहेत यापेक्षा सिनेमाची कथा उजवी आहे की नाही याकडे त्याचा कल असतो. टेक केअर गुड नाईट सिनेमाचा विषयही वेगळा आहे. या वेगळ्या विषयाला न्याय देण्यासाठी शेवटी त्याच तोडीचे कलाकार आवश्यक असतात. दिग्दर्शक गिरीश जोशी यांनी सिनेमासाठी योग्य कलाकार निवडले.सिनेमाची कथा अविनाश (सचिन खेडेकर), आसावरी (इरावती हर्षे) आणि त्यांची १९ वर्षांची मुलगी सानिका (पर्ण पेठे) यांच्या भोवती फिरताना दिसते. आजही जुनी पिढी ही नव्या तंत्रज्ञानाला आपलंसं करत नाही. आता काय गरज आहे. सगळं तर झालं... असं म्हणत नव्या बदलांकडे सपशेल पाठ करुन उभी राहते. यांच्यातील एक म्हणजे अविनाश. नोकरीमध्ये नवीन सॉफ्टवेअर शिकण्यापेक्षा स्वेच्छानिवृत्ती घेणं पसंत करतो. एकीकडे आयुष्य सुरळीत चाललं असताना अचानक त्यांच्या आयुष्यात एक असं वळण येत ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्य विस्कळीत होऊन जातं. अविनाशच्या अकाऊंटमधून हॅकर त्याचे ५० लाख रूपये चोरतो.

हॅकरचा शोध लावताना सानिकाचा ऑनलाइन फ्रेंड गौतम (आदिनाथ कोठारे) तिच्यासोबतचा एमएमएस व्हिडिओ सोशल मीडियावर दोन भागांमध्ये शेअर करतो. एकाचवेळी आलेल्या या संकटांना तोंड देताना अविनाश इन्स्पेक्टर पवारांची (महेश मांजरेकर) मदत घेतो. सायबर क्राइम विभागात काम करणारे पवार अविनाशच्या कुटुंबाच्या मदतीने प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करतात.सिनेमाची पटकथा कुठेही भरकटताना दिसत नाही. ११० मिनिटांच्या या सिनेमात लेखकाला काय सांगायचे आहे ते कळून येते. इंटरेस्टिंग प्लॉट, नव्या पिढीची गोष्ट, असहाय्य पालक आणि लबाड खलनायक यांच्यामुळे संपूर्ण कथा रंजक होते. मात्र सिनेमाचे संकलन मात्र फार कमकूवत आहे. अनेक दृश्यात ते सतत जाणवत राहते. त्यामुळे सिनेमा पाहताना अनेकदा अशा गोष्टींकडेच लक्ष जाते आणि मूळ सीन निघून जातो. तसेच विनोद करण्याच्या नादात काही दृश्यांमध्ये अशक्य गोष्टही दाखवण्यात आली आहे. इन्स्पेक्टर पवार जेव्हा गौतमला त्याच्या घरी पकडतात तेव्हा गौतम आई आतल्या खोलीत आजारी असल्याचं सांगत तिला भेटून येतो असे सांगतो. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत इन्स्पेक्टर पवार त्याला न अडवता घरात जाऊ देतात आणि तो तिथून पळून जातो. एखादा आरोपी आपल्या तावडीत सापडल्यावर कोणताही पोलीस त्याला एकट्याला घरात सोडून घराबाहेर त्याची वाट पाहत उभा राहिल हे दृश्य दिसणं अशक्य आहे.सायबर क्राइमसोबत पालक आणि मुलांमध्ये असलेल्या जनरेशन गॅपवरही सिनेमात भाष्य करण्यात आले आहे. मुलांची बदलत जाणारी मानसिकता आणि त्याच्यासोबत सांभाळून घेताना आई- वडिलांची होणारी दमछाक उत्तमरित्या दाखवण्यात आली आहे. सेक्स, एमएमएस, लिव्ह- इन रिलेशनशिप या गोष्टींवर भाष्य करताना कोणालाही अवघडल्यासारखं वाटणार नाही याची काळजी लेखक- दिग्दर्शक गिरीश जोशी यांनी घेतली आहे.सचिन खेडेकर यांनी अगतिक बापाची भूमिका उत्तमरित्या वठवली आहे. तर महेश मांजरेकर यांनी साकारलेला इन्स्पेक्टर पवार चित्रपटगृहातून बाहेर निघतानाही लक्षात राहतो. गिरीश जोशी यांचे नाना पाटेकरांचा आपला माणूस आणि टेक केअर गुड नाईट हे दोन्ही सिनेमे थ्रिलर पठडीतले असले तरी दोघांची तुलना होऊ शकत नाही. आपला माणूस सिनेमाची कथा ही एका अपघाताभोवती फिरत असते तर टेक केअर गुड नाईटमध्ये सायबर क्राइमची कथा मांडण्यात आली आहे. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण कोणत्या स्थानावर आहोत हे मनोरंजनात्मक पद्धतीने पाहायचे असेल तर टेक केअर गुड नाईट सिनेमा पाहायला हरकत नाही.मधुरा नेरूरकरMadhura.Nerurkar@nw18.com

Trending Now