मुंबई, 3 जून : अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण मीरा चोप्रा नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते. पण आता मात्र एका वेगळ्याच गोष्टीमुळे ती चर्चेत आली आहे ते म्हणजे तिला सोशल मीडियावरुनच एका युजरनं बलात्काराची धमकी दिली आहे. तिच्या पोस्टवर अपशब्द वापरुन कमेंट करत एका युजरनं तिला बलात्काराची धमकी दिली. ज्यानंतर तिनं सायबर क्राइम पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे. दरम्यान हे प्रकरण साउथ सुपरस्टार ज्यूनिअर एनटीआरशी संबंधीत असल्याची माहिती मिळाली आहे. मीरा चोप्रानं नुकतंच तिच्या ट्विटर हॅन्डवर चाहत्यासाठी प्रश्नोत्तरांचं सेशन ठेवलं होतं. या सेशनमध्ये तिला एका युजरनं साउथ अभिनेता ज्यूनिअर एनटीआरशी संबंधीत प्रश्न विचारला. ज्याच्या उत्तरात तिनं मी त्याला ओळखत नाही आणि मी त्याची चाहती सुद्धा नाही असं उत्तर दिलं.
मीराच्या या उत्तरावर सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जाऊ लागलं आणि मग काही सोशल मीडिया युजर्स तिच्यावर भडकले आणि तिला सोशल मीडियावरच शिव्या देऊ लागले. काहींनी तर तिला पॉर्न स्टार म्हटलं, तर काहींना तिचे आई-वडील कोरोनानं मरावे असं म्हटलं. पण सर्व मर्यादा तेव्हा पार झाल्या जेव्हा काही युजर्सनी तिला बलात्काराची धमकी दिली.
या नंतर सोशल मीडियावर मीराच्या समर्थनार्थ #WeSupportMeeraChopra हे ट्रेंड होऊ लागलं. मीरानं अशाप्रकारे शिव्या देणाऱ्या युजर्सची तक्रार राष्ट्रीय महिला आयोग आणि सायबर पोलिसांकडे केली आहे. याशिवाय तिनं यानंतर एक ट्वीट केलं ज्यात तिनं ज्यूनिअर एनटीआरला टॅग करुन विचारलं की, ‘जर ती महेश बाबूची चाहती असेल तर त्याचे चाहते तिला अशाप्रकारे शिवीगाळ करणार का?’ मीरानं पुढे लिहिलं, ‘मी केवळ महेश बाबूची चाहती आहे म्हणून मला वेश्या किंवा पॉर्नस्टार म्हटलं जाईल असं वाटलं नव्हतं. मला आशा आहे की तुम्ही माझ्या ट्वीटकडे दुर्लक्ष करणार नाही.’ मात्र यावर महेशबाबू किंवा ज्यूनिअर एनटीआर यापैकी कोणाचीही प्रतिक्रिया आलेली नाही.