महेश बाबू
मुंबई, 28 सप्टेंबर- साऊथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच अभिनेत्याच्या आई इंदिरा देवी यांचं निधन झालं आहे. त्यामुळे मनोरंजन सृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. साऊथ अभिनेता महेश बाबूची आई इंदिरा देवी या गेल्या काही आठवड्यांपासून आजारी होत्या.हैद्राबादमधील एआयजी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही दिवसांपासून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज पहाटे त्यांची होती. त्यातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिनेता महेश बाबू अनेकवेळा आपल्या आईला भेटण्यासाठी रुग्णालयात आलेला पाहण्यात आलं होतं. सुपरस्टार कृष्णा यांनी इंदिरा देवी यांच्यापासून विभक्त होत विजयनिर्मलाशी लग्न केलं होतं. त्यानंतर इंदिरा देवी या एकट्याचा राहिल्या होत्या. त्यांनी पुन्हा लग्न केलं नाही. महेश बाबू आणि त्यांच्या आईमध्ये फारच छान बॉन्डिंग होतं. अभिनेता सतत सोशल मीडियावरुन आपल्या आईबाबतचं प्रेम आणि आपुलकी व्यक्त करत असे. अभिनेत्याच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक दुःख येत आहेत. काही दिवसांपूर्वी महेश बाबू यांचा मोठा भाऊ रमेश बाबू यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आता त्यांच्या आईचं निधन झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (हे वाचा: राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांना भेटताच ढसाढसा रडली भारती; कपिल शर्मालाही अश्रू अनावर ) महेश बाबू यांच्या आईच्या निधनाची माहिती मिळताच त्यांचे जवळचे नातेवाईक आणि इतर कुटुंबीय अभिनेत्याच्या निवासस्थानी पोहोचत आहेत. त्यांच्यावर काही वेळेनंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.