मुंबई, 24 ऑगस्ट- साऊथ आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता कमल हसन यांच्या बहुप्रतीक्षित ‘इंडियन 2’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. हा एक थरारक असा अॅक्शन चित्रपट आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची माहिती देत एक नवीन पोस्टर शेअर केलं आहे. यामध्ये अभिनेते कमल हसन जबरदस्त लुकमध्ये दिसून येत आहेत. हा पोस्टर शेअर करत ‘तो परत आला आहे’, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. सध्या हा पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड पसंत केला जात आहे. कमल हसन यांच्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात काजल अग्रवाल, बॉबी सिन्हा,सिद्धार्थ,रकुल प्रीत सिंह, प्रिया भवानी शंकर, गुरु सोमसुंदरम आणि समुथिरकणी यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत. यातील काही कलाकार येत्या सप्टेंबर महिन्यात शूटिंगला सुरुवात करणार आहेत. या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग हे चेन्नईमधील पॅरिस कॉर्नर याठिकाणी उभारण्यात आलेल्या सेटवर केलं जाणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा एस शंकर सांभाळणार आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या चित्रपटाबाबत सांगायचं झालं, तर फेब्रुवारी 2020 मध्ये सेटवर मोठा अपघात आला होता. यामध्ये सेटवरील काही क्रू-मेम्बर्सचा मृत्यूही झाला होता. त्यांनंतर चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाबाबत पिंकव्हीलाशी बोलताना कमल हसन यांनी म्हटलं होतं, ‘आमच्यासमोर अनेक अडचणी आल्या होत्या.
**(हे वाचा:** Athiya Shetty-KL Rahul: अथिया शेट्टी-केएल राहुल कधी करणार लग्न? सुनील शेट्टीनीं दिली मोठी अपडेट ) आधी कोरोनाची लाट त्यानंतर सेटवरील लोकांचा मृत्यू. या सर्व प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी होत्या. परंतु आम्ही यामधून स्वतःला सावरत पुढे गेलो. कामाबाबत बोलताना त्यांनी पुढं म्हटलं, आम्हाला पोट भरण्यासाठी बाहेर जाऊन काम करावं लागतं. आम्ही एकाच चित्रपटात अडकून राहू शकत नाही. मुघल-ए-आजमची पुनरावृत्ती होऊ शकत नाही. आम्ही एकाच चित्रपटासोबत दशकभर बसू शकत नाही’. त्यानंतर आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कलाकारांनासुद्धा नक्की दिलासा मिळाला असणार यात शंका नाही.