मुंबई, 10 सप्टेंबर- बॉलिवूडमधील हॅन्ड्सम हंक म्हणून अभिनेता हृतिक रोशनला ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये हृतिक चाहत्याचे पाय धरताना दिसून आला होता. त्यानंतर आता हृतिकचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये हृतिक चाहत्यांवर रागावताना दिसत आहे. खरं तर, हृतिक रोशन आपली दोन मुलं रिहान आणि हृदानसोबत जुहूमध्ये एका चित्रपटगृहात ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. हा व्हिडिओ त्यादरम्यान बनवण्यात आला आहे. हृतिक आपल्या मुलांसोबत चित्रपट पाहून बाहेर पडत होता. जेव्हा तो त्याच्या कारमध्ये बसणार होता, तेव्हा एक चाहता त्याच्यासोबत जबरदस्तीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. ज्यामुळे तो थोडा संतापला. एका फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये हृतिक रोशन कारबाहेर उभा असलेला दिसत आहे. आपल्या मुलांना कारमध्ये बसवण्यासाठी तो बाहेर उभा होता. त्यानंतर एका चाहत्याने हृतिकच्या सुरक्षारक्षकांना ढकलून जबरदस्तीने हृतिकसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. हे सर्व पाहून ह्रतिकला राग अनावर झाला. आणि तो त्या चाहत्यावर भडकला.
**(हे वाचा:** Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र’मधील खलनायकाने वेधलं लक्ष; सौरभ गुर्जर नेमका आहे तरी कोण? ) सुरुवातीला हृतिक रोशनच्या सुरक्षारक्षकांनी त्या चाहत्याला रागाच्या भरात फटकारलं. त्यानंतर हृतिक कारमध्ये बसण्यापूर्वी संतापून म्हणताना दिसत आहे, “काय करत आहेस? तो काय करत आहे?" हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी हृतिकच्या समर्थनार्थ कमेंट करत अशा चाहत्यांना आवाहन केलं आहे की, एखाद्या कलाकाराच्या खाजगी आयुष्याचा आदर करा.जेव्हा कलाकार आपल्या मुलांसोबत असतात तेव्हा त्यांना थोडी प्रायव्हसी द्या’. तर काहींनी कमेंट करत हृतिकला ट्रोल केलं आहे. त्यांनी ट्रोल करत लिहलंय, ‘इतका ऍटिट्यूड’. तर आणखी एकाने लिहलंय, ‘का तुम्ही या लोकांना डोक्यावर घेता’. अशाप्रकारे या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.