मुंबई, 26 मे : बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. सध्या प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनससोबत अमेरिकेत आहे. आज अमेरिकेत मेमोरिअल डे साजरा होतोय आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रानं तिच्या आईवडीलांचा जुना फोटो शेअर करत सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रियांका चोप्रा ही आर्मी ऑफिसरची मुलगी आहे. तिचे वडील अशोक चोप्रा आणि आई मधू चोप्रा दोघंही भारतीय सैन्य दलात होते. प्रियांकानं मेमोरिअल डे ला आपल्या आईवडीलांचा आर्मी युनिफॉर्ममधील थ्रोबॅक फोटो शेअर करत सर्व शहीद सैनिंकांना श्रद्धांजली वाहिली. या फोटोच्या कॅप्शनमध्ये प्रियांकानं लिहिलं, माझे आई-बाबा दोघंही भारतीय सैन्य दलाच्या सेवेत होते. त्यामुळे मला जगातल्या प्रत्येक मिलिटरी फॅमिलीबद्दल आपलेपणा वाटतो. आज या सर्व हिरोंचा विचार करुया ज्यांनी त्यांचं आयुष्य देशाच्या रक्षणासाठी वेचलं.
प्रियांका चोप्राच्या आई-बाबांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या फोटोवर तिची चुलत बहीण आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा हिनं सुद्धा कमेंट केली आहे. परिणितीनं लिहिलं, मोठे बाबा आणि मोठी आई नेहमीच सर्वोत्कृष्ट आहेत. प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच राजकुमार राव सोबत व्हाइट टायगर या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय प्रियांका आणि निक मिळून संगीत सेरेमनीवर एक वेब सीरिज तयार करणार आहेत मात्र सध्या कोरोना व्हायरसमुळे या वेब सीरिजचं काम पुढे ढकलण्यात आलं आहे.