मुंबई, 04 जून : ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’ सारखा लोकप्रिय सिनेमांची निर्मिती करणारे बासु चॅटर्जी यांचं निधन झालं. ज्य़ेष्ठ दिग्दर्शक, निर्माते बासु चॅटर्जी यांनी वयाच्या 90 व्या वर्षी त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनी ही माहिती दिली. अशोक पंडित यांनी ट्वीट केले की, ‘महान चित्रपट निर्माता बासु चटर्जी यांचे निधन झाल्याचे सांगून मला फार वाईट वाटले. आज दुपारी अडीच वाजता सांताक्रूझ येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.’
बासु चॅटर्जी यांच्या निधनाचं कारण अद्याप समजू शकलं नाही. सांताक्रूझ इथे त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘चमेली की शादी’, ‘खट्टा मीठा’, रजनीगंधा अशा चित्रपटांना लोकांना मनात आणि घरात पोहोचवून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे अनेक चित्रपट मध्यमवर्गीय कुटुंबांवर आधारित होते. त्यांच्या अचानक जाण्यानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. संपादन- क्रांती कानेटकर