नवी दिल्ली, 6 सप्टेंबर: आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात भगवान बालाजीच्या दर्शनासाठी आलेल्या चित्रपट अभिनेत्री अर्चना गौतमने मंदिर अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. अर्चनाने याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने मंदिर अधिकारी महिलांशी गैरवर्तन करत असल्याचा आरोप केला आहे. मला बालाजीच्या दर्शनासाठी तिकीट देण्यात आलं नाही आणि अधिकाऱ्यांनी माझ्याशी गैरवर्तन केल्याचं तिने व्हिडिओत म्हटलंय. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत अर्चनाने तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या (TTD) अधिकाऱ्यांवर दर्शनासाठी तिकीट न दिल्याचे, तिकिटासाठी 10,500 रुपये मागितल्याचा आणि गैरवर्तनाचे आरोप केलेत. अर्चना गौतम म्हणाली, ‘भारतातील हिंदू धार्मिक स्थळे लुटीचा अड्डा बनली आहेत. तिरुपती बालाजी संस्थानमध्ये धर्माच्या नावाखाली महिलांशी असभ्य वर्तन केलं जातं. मी आंध्र प्रदेश सरकारला विनंती करते की या TTD कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.’ हे (अधिकारी) व्हीआयपी दर्शनाच्या नावावर एका व्यक्तीकडून 10,500 रुपये घेतात. लोकांना लुटणं बंद करा.’ हेही वाचा - अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाचं ठिकाण ठरलं; इथे घेणार सात फेरे अर्चना ठरलेल्या तारखेला आल्या नाहीत तिरुमला तिरुपती देवस्थानमने (TTD) या संपूर्ण घटनेबाबत एक प्रेस नोट जारी केली आहे. त्यात टीटीडीने म्हटलंय की, ‘शिवकांत तिवारी, अर्चना गौतम आणि इतर 7 जण केंद्रीय मंत्र्यांचं पत्र घेऊन 30 (ऑगस्ट) रोजी मंदिरात पोहोचले होते. TTD च्या अतिरिक्त EO ने त्यांना भगवान श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी 300 रुपयांचं तिकीट दिलं. त्यांच्या (अर्चना) फोनवर मेसेजही पाठवण्यात होता. मात्र त्या 30 तारखेला दर्शनासाठी आल्या नाहीत आणि 31 तारखेला टीटीडी ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी तिकीट मागायला सुरुवात केली.
अधिकाऱ्यांनी केला गैरवर्तनाचा आरोप
अर्चनाच्या तिकीटाची मुदत संपली होती, पण तरीही तिने गोंधळ घालत अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अधिकार्यांनी तिला ती श्रीवानी ट्रस्टकडून 10,000 रुपयांसह 500 रुपयांचे व्हीआयपी ब्रेक दर्शन तिकीट घेऊ शकते, असं सुचवलं होतं. मात्र, तिने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून खोटे आरोप करण्यास सुरुवात केली. टीटीडीने देवाच्या दर्शनासाठी तिकिटासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली होती, हे पूर्णपणे खोटं आहे, असं टीटीडीने सांगितलं. त्या लोकांना 300 रुपयांचं तिकीट दिलं होतं. तरीही त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली, त्यात टीटीडीने अभिनेत्रीशी कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन केलं नसून, तिनेच अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचं समोर आलंय, असं स्पष्टीकरण टीटीडीने दिलं. दरम्यान, अर्चना गौतम अभिनेत्री असण्याबरोबरच यूपीमधील काँग्रेस नेत्या (Congress Leader) आहेत. त्यांनी या वर्षी काँग्रेसच्या तिकिटावर यूपीमधील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला होता.