मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वडिलांचं कोरोनामुळं निधन; शेती करुन वडिलांना दिली अनोखी श्रद्धांजली
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अश्विनी महांगडे ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या मालिकेत तिनं साकारलेली राणू आक्का ही व्यक्तिरेखा तुफान गाजली होती.
आपल्या जबरदस्त अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण करणाऱ्या अश्विनीवर नुकताच दु:खाचा डोंगर कोसळला होता. तिच्या वडिलांचं कोरोनामुळं निधन झालं होतं.
अश्विनीचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांनी वयाच्या ५६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मात्र तरी देखील अश्विनी खचली नाही. तिनं आपलं दु:ख बाजूला सारत शेतकामाला सुरुवात केली.
“आज हळद लावली. नानांचे हळदीवर विशेष प्रेम असायचे. नाना सोबत असल्याची जाणीव मला प्रत्येक गोष्ट करून देत असते त्यातलीच ही एक गोष्ट.” अशी प्रतिक्रिया देत तिनं शेती करतानाचा फोटो शेअर केला आहे.
मालिकेत संभाजी राजांना लढण्यासाठी प्रेरणा देणारी ही राणू आक्का खऱ्या आयुष्यात देखील तितकीच संयमी आहे. तिच्या या संयमाची अनेकांनी स्तुती केली आहे.