सायली संजीव
मुंबई, 22 ऑक्टोबर : मराठी अभिनेत्री सायली संजीव ही सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. ती लवकरच ‘हर हर महादेव’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी ‘महाराणी सईबाई भोसले’ यांच्या भूमिकेत अभिनेत्री सायली संजीव झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु असून सायली यामध्ये व्यग्र असलेली पहायला मिळत आहे. नुकतंच सायलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तीनं ‘बस बाई बस’ च्या आगामी भागात हजेरी लावली असल्याचं पहायला मिळत आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर बस बाई बस च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री सायली संजीवनं हजेरी लावल्याचं पहायला मिळत आहे. सायलीसोबत व्हिडीओमध्ये अभिनेता शरद केळकरही दिसत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमधून सायली संजीवच्या एका गोष्टीचा खुलासा झाला आहे. सायलीला सकाळी सकाळी उठल्यावर ब्रश करण्याच्या आधी टीव्हीचा रिमोट लागतो. तिला उठल्यावर बातम्या पहायची सवय आहे. तिच्या वडिलांनी तिला ही सवय लावल्याचं सायली सांगते. तिचं हे ऐकूण शरद म्हणतो की, ती एवढं काम करते त्यामुळे ती कुठेना कुठे दिसते तर ती स्वतःला पाहण्यासाठी टीव्ही लावते, हे ऐकूण बस बाईच्या मंचावर एकच हशा पिकतो.
झी मराठी वाहिनीवर अगदी कमी कालावधीत लोकप्रिय झालेला कार्यक्रम म्हणजे ‘बस बाई बस’. खास महिलांसाठी असलेल्या या कार्यक्रमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांची हजेरी पहायला मिळाली आहे. या कार्यक्रमातून पाहुण्यांविषयी अनेक गोष्टी समोर येतात. सुबोध भावे प्रत्येक पाहुण्यांवर प्रश्नांचा भडिमार करत असतात. अशातच कार्यक्रमाच्या आगामी भागात अभिनेत्री सायली संजीव हजेरी लावणार आहे. तिच्यासोबत शरद केळकरही दिसणार आहे.
दरम्यान, अभिजीत देशपांडे लिखित, दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सची असून यात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या दिवाळीत म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी पाच भाषांमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.