मुंबई, 27 डिसेंबर : टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता कुशल पंजाबी याचं काल रात्री निधन झालं आहे. कुशालनं त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली असून कुशलच्या निधनाच्या वृत्ताला त्याचे जवळचे मित्र करणवीर बोहरा आणि चेतन हंसराज यांनी पुष्टी दिली आहे. काल रात्री उशीरा त्याच्या घरी कुशलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. कुशल अवघ्या 37 वर्षांचा होता. त्यानं आत्महत्या का केली यामागचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कुशलनं त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. त्यानंतर त्यानं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं होतं. ‘लव मॅरेज’, ‘सीआयडी’, ‘जिंदगी विन्स’ या त्याच्या गाजलेल्या मालिका आहेत. याशिवाय सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत काही सिनेमातही त्यानं काम केलं होतं. आज दुपारी कुशलवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. करणवीर बोहरानं शेअर केली बातमी कुशलच्या निधनाची बातमी त्याचा मित्र अभिनेता करणवीर बोहरा यांनं त्याच्या इन्स्टग्राम अकाउटंवरुन दिली. कुशल-करणवीर खूप चांगले मित्र होते. करणवीरनं लिहिलं, ‘तुझ्या मृत्यूच्या बातमीनं मला फार मोठा धक्का बसला आहे. मला या गोष्टीवर अद्याप विश्वास बसत नाही आहे. तू आमच्यात नाहीस पण जिथे कुठे असशील तिथे खूश असशील अशी आशा करतो. ज्याप्रमाणे तू जगलास त्यानं मला नेहमीच प्रेरणा मिळाली. पण असं काही होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.’
त्यानं पुढे लिहिलं, डान्सिंग, फिटनेस, ऑफरोड बाइकिंग, फादरहुड आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तुझं स्मितहास्य, आनंदी चेहरा हे सर्व मी खूप मिस करेन. तू माझ्या आठवणीत राहिल अशी ती व्यक्ती आहेस ज्यानं त्याचं पूर्ण आयुष्य खूप चांगल्या प्रकारे व्यतित केलं.
कुशलनं शेवटचं ‘इश्क मे मरजावा’ या मालिकेत काम केलं होतं. त्याच्या पर्सनल लाइफ बद्दल बोलायचं तर त्यानं Audrey Dolhen हिच्याशी 2015 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगा सुद्धा आहे.