अमोल परचुरे, समीक्षक
आपल्याकडे फार कमी दिग्दर्शक असे आहेत जे आपली हुशारी, सिनेमावरची पकड दर सिेनमागणिक वाढवत नेतात. रामगोपाल वर्मासारखी बरीच उदाहरणं आहेत जे स्वत:च्या प्रेमात पडून आपला फॉर्म हरवून बसतात, पण इम्तियाज अली हा एकमेव दिग्दर्शक असा आहे ज्याच्या कामात सातत्य आहे, दर्जा आहे आणि तोचतोचपणा अजिबात नाही.
सिनेमा या माध्यमावरची आपली पकड आता आणखी घट्ट झालीये हे त्याने ‘तमाशा’मधून दाखवून दिलंय. प्रत्येकवेळेस तीच स्टोरी का? असा प्रश्न विचारत त्याने प्रेक्षकांसमोर एक वेगळीच स्टोरी सादर केलीये. वेगळी असली तरी तुमच्या-आमच्या सर्वांची आहे. वरवर दिसायला ही लव्हस्टोरी असेलही पण सिनेमा बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की सिनेमातला प्रॉब्लेम हा प्रत्येकाला भेडसावणारा आहे. काही सिनेमा आपल्यावर प्रभाव पाडतात, काही सिनेमे मस्त मनोरंजन करतात तर काही आपलयाला शिकवूनही जातात.असाच हसत हसत जगण्याची शिकवण देणारा हा इम्तियाज अलीचा आणखी एक मास्टरपीस आहे असं नक्कीच म्हणता येईल.
काय आहे स्टोरी ?
इम्तियाज अली आणि रणबीर कपूर या जोडीचा रॉकस्टार आपण आधी पाहिलेला आहे. आता या ‘तमाशा’मध्ये आपण रॉकस्टार आहोत हेच माहित नसलेल्या तरुणाची गोष्ट आहे. फ्लॅशबॅक आणि आत्ताची दुनिया यामध्ये खेळवत प्रेक्षकांना कथा सांगायची इम्तियाजची आवडती स्टाईल आहे, पण इम्तियाजने तमाशामध्ये आपली ही आवड थोडी बाजूला ठेवली आहे, कथा सरळ नसली तरी सरळमार्गाने पुढे जात राहते.
इम्तियाज प्रयोगशील असल्यामुळे त्याने रंगमंचावरील प्रयोग सिनेमात करुन दाखवलेले आहेत, याच प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेतलाच पाहिजे. प्रतिकांचा वापर आहेच पण त्याशिवाय रंगमंचावर जाणवणारा जिवंतपणाही सिनेमात आहे. लोकेशन्समुळेही हा फ्रेशनेस आला असेल, कॉर्सिका बेटावरची दुनिया खरंच खूप अप्रतिम आहे. याशिवाय सिमलाचं सौंदर्यही सिनेमात आहे. कॉर्सिका आणि सिमलामधून कॅमेरा दिल्लीमध्ये आला की कथेचा वेगही थोडा मंदावतो, पण लगेच कथेला ट्रॅकवर आणण्यात इम्तियाज यशस्वी झालाय हा प्रेक्षकांसाठी दिलासा…
परफॉर्मन्स
अभिनयात रणबीर कपूरचं काम एक नंबर…इम्तियाजमधल्या दिग्दर्शकाप्रमाणे रणबीरमधला अभिनेतासुद्धा आता प्रयोगशील झालाय, एक एक पाऊल पुढे जायला लागलाय. अभिनयातील नवनवीन शक्यतांचा अभ्यास करताना दिसतोय. बर्फी, बॉम्बे वेलवेट, ये जवानी है दिवानी यातल्या रणबीरची आठवण होत नाही हे त्याचं खूप मोठं यश आहे.
दीपिकानेसुद्धा समंजसपणे काम केलंय, भूमिकेला गरजेची प्रगल्भता तिने चांगलीच दाखवलीये. इतर कलाकारांमध्ये पियुष मिश्राचा उल्लेख करावाच लागेल. त्याच्या अभिनयाची ताकद काय आहे यासाठी तरी सिनेमा बघावाच लागेल. एकंदरित, तमाशा हा लोणच्यासारखा आहे, कारण तो मनात मुरत जातो, आठवत राहतो…ही लोणच्याची उपमा पटतेय का हे बघायला तमाशा नक्की बघा.
रेटिंग 100 पैकी 80
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++