शिर्डी, 5 ऑक्टोबर : समाज बधीर होण्याच्या स्थितीत आहे की काय, असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्रात पुन्हा एकदा नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भावानेच अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. संगमनेर तालुक्यात ही घटना घडली. चुलत भावाने बहिणीवर सातत्याने अत्याचार केले. यातून अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आरोपी भावावर अत्याचार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. चुलत भावानेच अल्पवयीन बहिणीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नात्यातीलच व्यक्ती जर आयुष्य उद्धवस्त करणार असेल तर मुलींनी समाजात जगायचं कसं, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. महाराष्ट्रात नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनांमध्ये वाढ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने गणपती सणापासून मावशीकडे पाहुणी म्हणून येऊन राहिलेल्या 8 वर्षीय मुलीवर काकाने वेळोवेळी अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक घटना जांभुळपाडा (चावे )येथे 3 ऑक्टोबर रोजी समोर आली. दुसरीकडे, चंद्रपूर जिल्ह्यात 12 वर्षाच्या मुलीवर नात्यातील चुलत काकाने अत्याचार केल्याची घटना उजेडात आली. गोंडपिंपरी तालुक्यातील येनबोथला गावातील ही घटना असून 26 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. घरात आजोबाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रिजीरिवाजानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी आलेल्या पाहुण्यांना जेवणाची पंगत वाढत असताना काकाने 12 वर्षीय पुतणी बाहेर गेल्याची संधी साधली आणि तिला ओढत घराशेजारी असलेल्या बांबूच्या रांजीत नेले व तिथेच तिच्यावर बलात्कार केला.