नवी दिल्ली, 05 मे : संपूर्ण देशात सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे हाहाकार पसरला आहे. याच दरम्यान हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारमध्ये एका 32 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मृत महिला पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्स रुग्णालयात पाठवला आहे. ही घटना दक्षिण दिल्लीच्या लोधी कॉलोनीमध्ये ठाणे परिसरात घडली आहे. इथे एका कारमध्ये महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारत, मृतक महिला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमध्ये तैनात हेड कॉन्स्टेबलची पत्नी होती. तिच्या पोलीस पतीनेच तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. काल आरोपी हेड कॉन्स्टेबल आपल्या ड्युटीवर होता. ड्यूटी संपवून त्यानं ही घटना घडवून आणली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत वापरलेली कार हेड कॉन्स्टेबलच्या मित्राची होती. आरोपी हेड कॉन्स्टेबल लोधी कॉलनी इथल्या स्पेशल सेल टेरर युनिटच्या कार्यालयातही तैनात होता. आणि घटनेनंतर लोधी कॉलनी परिसरातूनच मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. लोधी कॉलनी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रेणू असं मृत कॉन्स्टेबलचं नाव आहे. दरम्याने आरोपी पतीने पत्नीची हत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस याचा शोध घेत असून आरोपी पतीचाही शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. परिसरात अशा प्रकारे पोलीस महिलेचीच हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.