नवी दिल्ली, 13 मे : नुकतंच भारतात कोरोना रुग्णांच्या मृत्यूबाबत (corona patient death) नवीन नियमावली तयार करण्यात आली. ज्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे डॉक्टरांना नमूद करावं लागणार आहे. त्यांना श्वसन समस्या होती, हृदयाची समस्या होती की इतर आणखी काही कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला याचा उल्लेख डॉक्टरांना रिपोर्टमध्ये करावा लागणार. त्यात आता कोरोना रुग्णांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे होतो आहे, याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी कोरोना रुग्णांच्या मृत्यू कारण शोधून काढलं आहे. कोरोनाव्हायरसच्या गंभीर रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता अतिसक्रिय झाल्यानं कोरोना रुग्णांचा मृत्यू होतो आहे. याला वैद्यकीय भाषेत साइटोकाइन स्टॉर्म सिंड्रोम (cytokine storm syndrome) असं म्हणतात. फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरस सुरुवातीला श्वसनप्रमाणीला संक्रमित करतो, त्यानंतर पेशींमध्ये तो झपाट्यानं वाढतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये रोगप्रतिकारक क्षमतेला अतिसक्रिय करतो हे टप्प्याटप्प्यानं सांगितलं आहे. हे वाचा - मुंबईत 93 वर्षांच्या वृद्ध महिलेनं कोरोनाला हरवलं, डॉक्टरांनीही केलं कौतुक शास्त्रज्ञ प्राध्यापक दाइशून लियू यांच्या मते, “सार्स आणि मर्ससारख्या संक्रमणाप्नमाणेच कोविड-19 मध्येही अशी परिस्थिती उद्भवते. आकडेवारीनुसार स्पष्ट होतं की कोविड-19 च्या गंभीर रुग्णांमध्ये साइटोकाइन स्टॉर्म सिंड्रोम असू शकतो” “साइटोकाइम स्टॉर्म पांढऱ्या रक्तपेशी अतिसक्रिय होण्याची स्थिती आहे. या स्थितीत साइटोकाइनची रक्तात भरपूर मात्रेत निर्मिती होते. साइटोकाइन वेगानं विकसित झाल्यानं लिम्फोसाइट आणि न्यूट्रोफिलसारख्या प्रतिरक्षा पेशींना आकर्षित करतात. ज्यामुळे या पेशी फुफ्फुसातील टिश्यूंमध्ये प्रवेश करतात आणि फुफ्फुसांना हानी पोहोचवतात”, असं लियू यांनी सांगितलं,. हे वाचा - राज्यात Lockdown 4.0 अटळ; आरोग्यमंत्र्यांनी दिला रुग्णवाढीचा इशारा! हे आहे कारण लियू म्हणाले, “पांढऱ्या रक्तपेशी निरोगी टिश्यूंवर हल्ला करू लागतात. ज्यामुळे फुफ्फुस, हृदय, यकृत, आतड्या, गुदद्वार आणि जननांगावर दुष्परिणाम होतो आणि ते कार्य करणं बंद करतात. इतर अवयवांनी काम करणं बंद केल्यानंतर फुफ्फुसही काम करणं बंद करू शकतात. या स्थितीला एक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणतात. साइटोकाइन स्टॉर्ममुळे तीव्र ताप आणि शरीरात रक्त जमा होण्यासारखी परिस्थिती निर्माण होते, असंही ते म्हणाले. संकलन, संपादन - प्रिया लाड