वॉशिंग्टन, 12 जानेवारी : जगभरात कोरोनानं हाहाकार माजल्यानंतर आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दहशतीचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत माणसच नाही तर प्राणी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. वाघ आणि सिंहानंतर आता गोरिला देखील या यादीमध्ये आला आहे. गोरिलाला कोरोनाची लागण होण्याची ही पहिली घटना असल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेतील एका प्राणीसंग्रहालयातील दोन गोरिलाचे रिपोर्ट चाचणीनंतर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबऴ उडाली. तर तिसऱ्या गोरिलामध्ये कोरोनाची सर्व लक्षणं आढळून आले आहेत. प्राणीसंग्रहालयातील ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली त्यांच्या संपर्गात गोरिला आल्यानं त्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील सॅन डिएगो झू सफारी पार्कमध्ये दोन गोरिला कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. सफारी पार्कचे कार्यकारी संचालक लिसा पीटरसन म्हणाल्या की खोकला आणि श्वासोच्छवासाच्या समस्या या दोन्ही गोरिलांमध्ये आढळून आली होती. त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे. याआधी जुलै 2020मध्ये शांगो नावाच्या 31वर्षीय गोरिलाची 26 वर्षीय बार्नी भावासोबत जोरदार लढाई झाली होती. त्यानंतर शांगोमध्ये तापाचे लक्षण दिसून आले. 7 जणांच्या टीमने त्याला पकडून त्याचे कोरोना टेस्टसाठी स्वॅब घेतले. शांगोच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. आता पुन्हा या दोन गोरिला पॉझिटिव्ह सापडल्यानं खळबळ उडाली आहे.