मुंबई, 18 मार्च : देशभरात सध्या कोरोना व्हॅक्सिनचा (Corona vaccine) तिसरा टप्पा सुरु आहे. या टप्प्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बुधवारी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत लसीकरण मोहीमेचा आढावा घेतला. सरकारी पातळीवरुन लसीकरण मोहीमेचा वेग वाढवलेला असतानाच भाजपा खासदार डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी (BJP MP Subramanian Swamy) यांनी यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. डॉ. स्वामी यांनी या विषयावर एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, ‘मीडिया रिपोर्टनुसार कोरोना व्हॅक्सिन घेतल्यानंतर देशभरात 71 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 70 जणांचा मृत्यू हा ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या मदतीनं तयार केलेल्या लशीमुळे झाला आहे. याची निर्मिती ही सीरम इन्स्टिट्यूट (SII) मध्ये करण्यात येत आहे. या विषयावर नीती आयोगानं एक रिपोर्ट देण्याचं आश्वासन दिलं आहे, मात्र अजून त्यांचा रिपोर्ट आलेला नाही. त्यामुळे त्यांना संसदेच्या आरोग्य समितीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स पाठवावे,’ अशी मागणी डॉ. स्वामींनी केली आहे.
पंतप्रधानांनी केलं आवाहन देशातील कोरोना परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बुधवारी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी लस वाया जात असल्याकडेही लक्ष वेधलं. (हे वाचा- पुण्यानंतर आता मुंबईतही कोरोना लशीची निर्मिती; इथं तयार होणार Corona vaccine ) आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामध्ये कोरोना लस वाया जात असल्याचं त्यांनी सांगितलं. लस का वाया जाते आहे, याकडेदेखील गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. कृपया लस वाया घालवू नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे.