मुंबई, 1 एप्रिल : सध्या जगभरात पसरलेल्या कोविड-19च्या साथीत (Covid-19 Pandemic) जगभरातील किमान 128 दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली असून, 27 लाख लोकांचा या आजारानं मृत्यू झाला आहे. या साथीचा प्रचंड मोठा फटका जगभरातील अर्थव्यवस्थेला (World Economy) बसला असून, कोट्यवधी डॉलर्सचं नुकसान झालं आहे. हा एवढा मोठा फटका आहे की तो भरून काढायला अनेक वर्षे लागणार आहेत. आता जगभरात कोविड-19 वरील विविध लसी उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळे हा रोग नियंत्रणात येण्यास मदत होईल; पण आजही शास्त्रज्ञांना हा विषाणू (Corona Virus) आला कुठून याचं रहस्य उलगडलेलं नाही. आजही त्यांना हा प्रश्न सतावत आहे. एमआयटी(MIT) तंत्रज्ञान अहवालानुसार(MIT Technology Review), चीन(China) आणि जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) नियुक्त केलेलं आंतरराष्ट्रीय संशोधन पथक कोविड-19च्या उगमाचा, मूळ स्रोताचा शोध घेत आहे. आतापर्यंत संशोधकांना हे माहित आहे की, कोरोनाचा विषाणू हा वटवाघळांमध्ये (Horseshoe Bat) सापडलेल्या विषाणूसारखाच असून, त्याद्वारे मानवप्राण्यात (Humans)त्याचं संक्रमण झालं आहे. सगळ्यात आधी डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहान(Wuhan) शहरात याचं अस्तित्व दिसून आलं आणि तिथूनच या शतकातील आतापर्यंतची सर्वांत मोठी आरोग्य आपत्ती ठरलेल्या कोविड-19 साथीला सुरुवात झाली. शेकडो मैल अंतरावर दुर्गम गुहेत राहणाऱ्या वटवाघळांमध्ये हा विषाणू निर्माण झाला आणि त्याचा मानवांमध्ये संसर्ग पसरला या तथ्यावर शास्त्रज्ञांनी शिक्कामोर्तब केलेलं नाही. तथापि, अद्याप त्यांच्या जाहीर न झालेल्या अहवालात, या साथीचा उद्रेक झाल्याच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते चीननं स्थानिक पातळीवर त्याचा स्रोत शोधण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याचा प्रसार याविषयी सर्व सखोल माहितीचा समावेश असणं अपेक्षित आहे. वुहानच्या बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या इतर वन्य प्राण्यांच्या ‘इंटरमिजिएट होस्ट’च्या माध्यमातून वटवाघळांमधील सार्स-सीओव्ही -2 हा विषाणू मानवांपर्यंत पोहोचला, असा आदर्श सिद्धांत मांडला गेला आहे. हा सोयीचा सिद्धांत म्हटला जात असला तरी आतापर्यंत वटवाघळांमधून अनेक विषाणूंचे माणसांमध्ये संक्रमण झालं आहे. 2003 मध्ये दक्षिण चीनमध्ये अशाच एका कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला होता आणि 7हजार 500 पेक्षा अधिक लोक आजारी पडले होते, तेव्हाही अशीच जागतिक दहशत निर्माण झाली होती. सार्सची(SARS) साथ आली होती तेव्हा, संशोधकांनी पिंजऱ्यात बंदिस्त करून विक्रीसाठी आणलेल्या प्राण्यांची चाचणी केली तेव्हा हिमालयातील पाम सिव्हट मांजरी(Pam Civet Cat) आणि रकून कुत्री (Raccoon Dogs) यांच्यात एकसारखा विषाणू आढळला. इथं हे प्राणी सर्रास खाल्ले जातात. या वेळी मात्र ‘इंटरमिजिएट-होस्ट’ ही एक मोठी समस्या आहे कारण या विषाणूचा प्रसार होऊन आता एका वर्षापेक्षा जास्त काळ उलटला आहे, तोपर्यंत कोणत्याही प्राण्याला विषाणू वाहक म्हणून निश्चितपणे ओळखणं शक्य झालेलं नाही. चीनी सैन्यातील प्रमुख संशोधक लियांग वाननियन (Liang Wannian) यांच्या म्हणण्यानुसार, कोणालाही या विषाणूचा मूळ स्रोत सापडलेला नाही त्यामुळेच या साथ रोगाचे रहस्य अद्याप कायम राहिलं आहे. चीननं हजारो डुक्कर, शेळ्या, कोंबड्या अशा प्राण्यांची तपासणी केली आहे, तरीही त्यांना भीती आहे की हा विषाणू जंगली ससे किंवा पाळीव प्राणी अशा नवीन प्रजातींमध्ये प्रवेश करेल. आता याबाबतीत जागतिक आरोग्य संघटना आणि चीन यांच्या संशोधन पथकाच्या अहवालाची प्रतीक्षा असून, त्यात या रहस्यावर (Mystery) काहीतरी प्रकाश पडेल अशी अपेक्षा आहे. त्यातूनच पुढील संशोधनाला दिशा मिळेल.