Maharashtra zero corona death : कोरोना महासाथीविरोधातील लढाईत 2 वर्षांनी राज्याला सर्वात मोठं यश मिळालं आहे.
गेली 2 वर्षे कोरोनाव्हायरस थैमान घालतो आहे. दिवसेंदिवस कोरोनाची प्रकरणं वाढत गेली. कोरोनाने किती तरी लोकांचा बळी घेतला. अखेर दोन वर्षांनी कोरोनाबाबत राज्यातून दिलासादायक बातमी मिळाली आहे.
राज्यातील कोरोनाव्हायरची दैनंदिन आकडेवारी जारी करण्यात आली आहे. 02 मार्च, 2022 च्या आकडेवारीतून कोरोनाबाबत पॉझिटिव्ह न्यूज समोर आली आहे.
राज्याच्या कोरोना आकडेवारीनुसार आज राज्यात 544 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आता एकूण 5643 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
दिवसभरात 1007 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 77,12,575 रुग्णांना बरे झाल्यानंतर हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 78,66,924 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1,43,706 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लाखो रुग्णांचा बळी घेणाऱ्या कोरोनामुळे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 1 एप्रिल 2020 नंतर 2 मार्च 2022 ला झिरो डेथची नोंद झाली.
17 मार्च 2020 ला राज्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. त्यानंतर 701 दिवसांनी आता एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. ही सर्वात दिलासादायक बातमी आहे.