अहमदाबाद, 19 जून : कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) भयंकर रूप धारण करून आता थोडी ओसरू लागली आहे. या लाटेत अनेक रुग्णांचे बळी गेले आहेत. दरम्यान, तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज टास्क फोर्सने (task force) वर्तवला आहे. साधारणपणे कोरोनाची (Covid-19) एकदा लागण झाल्यानंतर किमान तीन महिने तरी त्या व्यक्तीला कोरोनाची पुन्हा लागण होत नाही. कोरोनातून बरं झाल्यानंतर रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडीज (antibody) तयार होतात, असं डॉक्टर सांगतात; मात्र अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिथे एका व्यक्तीला 30 दिवस म्हणजेच केवळ एका महिन्याच्या आत दोन वेळा कोरोनाची लागण झाली. या घटनेनंतर डॉक्टरांनाही धक्का बसलाय. त्या व्यक्तीला एकाच महिन्यात दोन वेळा लागण कशी झाली, याची कारणं शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी एक संशोधन केलं. अहमदाबादमध्ये (Ahmedabad) चीफ फायर ऑफिसर (Chief Fire Officer) म्हणून काम करणारे राजेश भट्ट यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झाला. त्यांना गंभीर लक्षणं दिसत नव्हती. त्यामुळे ते घरीच क्वारंटाइन राहिले आणि बरे झाले; मात्र एका महिन्याने त्यांना पुन्हा कोरोना झाला. त्या वेळी लक्षणं खूप गंभीर होती. भट्ट यांना 13 दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं. आता ते कोरोनातून बरे झाले आहेत; पण एकाच महिन्यात दोनदा कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. हे ही वाचा- चिंता वाढली! 4 सिंहांमध्ये आढळला कोरोनाचा घातक डेल्टा व्हेरियंट दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यास तीव्रता कमी असते. रुग्णाला हॉस्पिटलला जाण्याचीही गरज भासत नाही, असं आतापर्यंत सांगितलं जात होतं; मात्र राजेश भट्ट यांच्या प्रकरणात नेमकं उलट घडलं. त्यांना पहिल्यांदा कोरोनाची लक्षणं सौम्य होती तर दुसऱ्यांदा लागण झाली त्या वेळी त्यांची प्रकृती फारच गंभीर झाली होती. गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये यावर अभ्यास करण्यात आला. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत B.1.617.2 या व्हॅरिएंटने हाहाकार माजवला. या व्हॅरिएंटला आता डेल्टा व्हॅरिएंट असं नाव देण्यात आलंय. या व्हॅरिएंटने रूप बदलल्याचं संशोधनामधून समोर आलंय. त्यात दोन अॅमिनो अॅसिड्स गायब झाल्याचं लक्षात आलं. व्हॅरिएंटमध्ये बदल झाल्यामुळे त्यावर अँटिबॉडीज प्रभावी ठरल्या नाहीत. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, व्हायरसच्या बदलत्या रूपांचा माग ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात जीनोम सिक्वेंसिंगची गरज आहे.