नवी दिल्ली, 15 डिसेंबर: कोविड -19 किंवा कोरोना विषाणूपासून (CoronaVirus) मुक्त झालेल्या बऱ्याच लोकांना एका दुर्मीळ आणि प्राणघातक ‘फंगल इन्फेक्शन’ (Fungal Infection) झाल्याचं आढळून आलं आहे, असा दावा दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील (Sir Gangaram Hospital) डॉक्टरांनी केला आहे. फंगल संक्रमण झालेल्या जवळपास अर्ध्या लोकांची दृष्टी गेल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. सोमवारी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी हा दावा केला. ते म्हणाले की, गेल्या 15 दिवसांत रुग्णालयातील डोळा-नाक-घसा (ENT) डॉक्टरांकडे अशी 13 प्रकरणं आली आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, ‘ही चिंताजनक आणि दुर्मीळ समस्या आहे, पण ती नवीन नाही.’ या डॉक्टरांनी पुढे असंही सांगितलं की, ‘कोविड -19 मुळं होणारं फंगल संक्रमण हे एक नवीन आहे.’ “गेल्या 15 दिवसांत कोविड -19 च्या फंगल संसर्गाची 13 प्रकरणे ईएनटी चिकित्सकांकडे आली असून त्यातील 50 टक्के रुग्णांनी आपली दृष्टी गमावली आहे” असंही रुग्णालयाने निवेदनात म्हटलं आहे. मृतांची एकूण संख्या 10,014 वर सध्या कोरोना विषाणू हळूहळू अधिक प्राणघातक बनत चालला आहे. विशेषतः राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. रविवारी दिल्लीतील एकूण 1984 जणांना कोविड - 19 ची लागण झाली आहे. असं असलं तरी संक्रमण दर घटून 2.74 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कोरोना साथीच्या आजारामुळे 33 लोकांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 10,014 वर गेली आहे. आरटी-पीसीआर पद्धतीने 35,611 जणांची कोरोना चाचणी दिल्लीमध्ये 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान संक्रमणाच्या दरात सातत्याने घट झाली आहे. या काळात कोरोना संक्रमणाचा दर अनुक्रमे 4.96 टक्के, 4.78 टक्के, 4.2 टक्के, 3.68 टक्के आणि 3.15 इतका होता. तर 8 डिसेंबरला कोरोना संक्रमणाचा दर पून्हा वाढून 4.23 टक्के एवढा झाला. आरोग्य विभागाच्या नवीन बुलेटिननुसार, एक दिवस अगोदर 72,335 लोकांचा कोरोना तपासणी केली होती. ज्यामध्ये ही कोरोना संक्रमणाची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यातील 35,611 लोकांची चाचणी आरटी-पीसीआर पद्धतीनं करण्यात आली.