नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीला या आठवड्यात (This week) जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या आपातकालीन वापरासाठीच्या लसींच्या यादीत कोव्हॅक्सिनचा अद्याप समावेश झालेला नाही. त्यामुळे अनेक भारतीयांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असून लवकरच या लसीला मान्यता मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. परदेशी जाणाऱ्यांना होतोय त्रास वास्तविक, ज्या नागरिकांना परदेशी प्रवास करावा लागतो, अशांना कोव्हॅक्सिन लस घेतल्यामुळे मोठ्या तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता नसल्यामुळे अनेक देशांमध्ये भारतीय नागरिकांना प्रवेश मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. ज्या लसींना जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता आहे, अशाच लसींना मान्यता देण्याची भूमिका जगातील बहुतांश देशांनी घेतली आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळणं, हा ही लस घेतलेल्या तमाम भारतीयांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. जुलैमध्ये जमा केली होती कागदपत्रं आपातकालीन वापरासाठीच्या मान्यतेसाठी भारत बायोटेककडून जुलै महिन्यात कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती. त्यानंतर या लसीच्या परिक्षणाची प्रक्रिया जागतिक आरोग्य संघटनेनं सुरू केली होती. त्यासाठी घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये ही लस 78 टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं होतं. आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेनं फायजर-बायोएनटेक, ऍस्ट्राझेनका, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉर्डना आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्डला अगोदरच मान्यता दिलेली आहे. हे वाचा - ‘‘भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैशांची दिली होती ऑफर’’ आमदाराचं खळबळजनक विधान आपातकालीन वापरासाठी मिळणार मंजुरी जागतिक आरोग्य संघटनेनं बहुतांश लसींना आपातकालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस भारतात संशोधित झालेली आणि भारतात निर्माण होणारी एकमेव लस आहे. या लसीचा मान्यता मिळणं, ही भारतासाठी महत्त्वपूर्ण घटना असणार आहे.