मुंबई, 24 एप्रिल : कोरोना व्हायरस देशात वेगानं संसर्ग वाढत आहे. मुंबईत आकडा 3 हजारहून अधिक आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तर घराबाहेर न पडण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे खूप हाल झाले आहेत. काम बंद पडलं आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या काळात छोटे दवाखाने बंद असल्यानं रुग्णाची गैरसोयही होत आहे. गोवंडीतील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या 60 वर्षीय वडिलांनी आपल्या आजारी मुलीला खांद्यावर घेऊन थेट 26 किलोमीटर अंतर चालत रुग्णालय गाठलं. गुरुवारी मोहम्मद रफी यांच्या मुलीच्या पोटात अचानक खूप दुखायला लागलं. तिला उठताही येत नव्हतं. तिची ही अवस्था पाहून वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. जवळपास डॉक्टर नाही. लॉकडाऊनमुळे गाड्या नाहीत मुलीला काही करून तातडीनं रुग्णालयात नेणं महत्त्वाचं होतं. जास्त विचार न करता वडिलांनी थेट मुलीला खांद्यावर उचलून घेतलं आणि गोवंडी ते परळ असा 26 किलोमीटर चालत आले. त्यांनी मुलीला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. खिशात उपचारासाठी पैसे नव्हते. इतकं अंतर भर उन्हातून पायी चालत आल्यानं खिशात एक पैसा नव्हता. लॉकडाऊनमुळे त्यांचं काम बंद पडल्याचं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं. आपली परिस्थिती डॉक्टरांसमोर ठेवली. डॉक्टरांनी माणुसकी दाखवत त्यांना आधार दिला आणि मुलीवर उपचार केले. उपचारानंतर पुन्हा 60 वर्षांच्या वडिलांनी मुलीला खांद्यावरून घरी नेलं. आपली मुलगी गडाबडा आजारानं लोळत असल्याचं वडिलांना पाहावलं नाही आणि त्यांनी भर उन्हात कोणताही जास्त विचार न करता मुलीला घेऊन रुग्णालय गाठलं. संपादन- क्रांती कानेटकर