महाराष्ट्रामध्ये पुन्हा कोरोनाचा आकडा वाढला
मुंबई, 4 एप्रिल : महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. मंगळवारी राज्यामध्ये कोरोनाचे 711 रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसामधली ही तब्बल 186 टक्क्यांची वाढ आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात 24 तासांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला, यात साताऱ्यातल्या 2, पुण्यातला 1 आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे 248 रुग्ण आढळले होते. राज्यात मागच्या 7 दिवसांमध्ये 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर 1.82 टक्के आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये 62 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 3,792 रुग्ण सक्रीय आहेत. महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या या वाढत्या स्थितीवर घाबरण्याची गरज नाही, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं. राज्यात काल 3 एप्रिल रोजी 3500 सक्रीय रुग्ण होते, ज्यापैकी पॉझिटिव्ह फक्त 52 रुग्ण असल्याचं त्यांनी सांगितलं, शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये भरती झालेल्या रुग्णांची फार कमी आहे, XBB 1.16 हा विषाणू वेगानं पसरतो आहे पण त्याचा धोका नाहीय, तरीसुद्धा नागरिकांनी सतर्क राहावं, सर्दी, ताप, खोकला असल्यास ताबडतोब डॉक्टरंचा सल्ला घ्यावा असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर कुटुंबासह सर्वजण बाहेर पडतील, मे महिन्यात सुट्टीनिमित्त पर्यटनस्थळी, मंदिरांमध्ये गर्दी होऊ शकते, तेव्हा कोरोनाची पंचसूत्री पाळायला हवी, मास्क वापरणं, सॅनिटाईज करणं, हात-पाय धुणं आणि अंतर बाळगणं या सूचनांचं नागरिकांनी पालन करावं असं तानाजी सावंत यांनी म्हटलं. राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे, सोलापूर जिल्ह्यात 22.8% , सिंधुदुर्ग जिल्ह्यात 15.8% ,पुणे जिल्ह्यात 13.2% , सांगली जिल्ह्यात 13.1% ,कोल्हापूर जिल्ह्यात 11.1& तर सातारा जिल्ह्यात 11% पॉझिटिव्हिटी दर आहे.सक्रीय रुग्णांमध्ये दैनंदिन वाढ होणारे मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर, नाशिक, सांगली आणि सोलापूर हे आठ जिल्हे आहेत. लोकसंख्येचं प्रमाण या जिल्ह्यांमध्ये अधिक असल्याने फैलावही या जिल्ह्यांमध्ये जास्त होताना दिसतोय.