हैदराबाद, 15 जून: भारतात सध्या तीन कोरोना लशी (Corona vaccine) दिल्या जात आहेत. यात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन (Covaxin) आणि रशियाची स्पुतनिक V (Sputnik V) या लशींचा समावेश आहे. या तिन्ही लशींमध्ये सर्वात महाग आहे ती मेड इन इंडिया कोवॅक्सिन. भारतातच तयार झालेल्या या लशीची किंमत इतकी जास्त का? असा प्रश्न उपस्थित होतोच. 21 जूनपासून देशात 18+ सर्वांना मोफत कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारमार्फत मोफत कोरोना लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. 21 जूनपासून 75 टक्के लस केंद्र सरकारमार्फत दिली जाणार आहे तर 25 टक्के लस खासगी रुग्णालयं थेट लस उत्पादकांकडून खरेदी करू शकतात. यासाठी सरकारने लशीची मूळ किंमत, सर्व्हिस चार्ज आणि जीएसटी पकडून एक निश्चित किंमत ठरवली आहे. खासगी रुग्णालयात कोविशिल्डची किंमत 780 रुपये, कोवॅक्सिनसाठी 1,410 रुपये, स्पुतनिक V 1,145 रुपये जास्तीत जास्त किंमत आहे. भारता बायोटेक कोरोना लशीचं उत्पादन, त्यासाठी आवश्यक संसाधन आणि क्लिनिकल चाचण्यांसाठी स्वतःच्या जोखमीवर 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सर्व पुरवठादारांचा विचार करता कोवॅक्सिन लशीची सरासरी किंमत ही 250 रुपयांपेक्षा कमी आहे. सरकारसाठी प्रति डोस 150 रुपये डोस देणं दीर्घकाळ शक्य नाही. त्यामुळे सर्व खर्च भरून काढण्यासाठी खासगी बाजारात लशीच्या किंमती जास्त आहेत.