समीर चवरकर, एचओडी प्रोडक्शन,आयबीएन लोकमत नुकतंच आम आदमी सरकार दिल्लीत सत्तेत आलं. प्रत्येक वृत्तवाहिनी, प्रत्येक वर्तमानपत्रानं त्याची दखल घेतली. नव्हे तर ती त्या दिवशीची टॉप स्टोरीच झाली. त्या घटनेचं विश्लेषण झालं. प्रत्येक क्षणाला घडणारी प्रत्येक घटना लोकांपर्यंत पोहोचवताना अनेक गोष्टींचा ऊहापोह झाला. पण एक पत्रकार म्हणून मला या घटनेनं वेगळा दृष्टिकोन मिळवून दिला.
आयबीएन लोकमतच्या माध्यमातून ही घटना लोकांपर्यंत पोहोचवताना अनेक क्षणचित्रं माझ्या डोळ्यासमोर उभी राहतात. रामलीला मैदानावरची ती सामान्य दिल्लीकरांची प्रचंड उपस्थिती. शपथविधीला आलेले अरविंद केजरीवाल आणि अन्य मंत्रिमंडळाचा मेट्रोमधला प्रवास. साधेपणाची झलक दाखवणारी केजरीवालांची ती निळ्या रंगाची मारुती व्हॅगनआर कार. मंत्रिमंडळाची चटईवरची बैठक अचानक मला जाणवला तो माध्यमात झालेला बदल आणि त्यामुळे होणारा जनमानसातला त्याचा परिणाम . कारण दोन वर्षांपूर्वी कोणालाही माहीत नसणारे केजरीवाल थेट मुख्यमंत्री झाले.
कोणाच्या खिजगणतीत नसणारे त्यांचे काही सहकारी मंत्री झाले. जसं याचं श्रेय त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध पुकारलेल्या लढाईला आहे तसेच त्या लढाईला लोकांपर्यंत पोहोचवणार्या मीडियालासुद्धा आहे. सुरुवातीला दोघाचौघांचे किंवा आपण म्हणूया एका समुदायानं पुकारलेल्या या लढ्याला जनलढ्याचं स्वरूप प्राप्त करून देण्यात माध्यमाची भूमिका निर्णायक होती. आणि म्हणूनच आपापसात भांडणार्या राजकीय पक्षाचे माध्यमांबाबत एकमत दिसत होते. मीडियाची अशा प्रकारे दखल घेतली जाणं हा बदलणार्या माध्यमाच्या जगातला खूपच दूरगामी परिणाम आहे. इजिप्तसारख्या देशातही इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि प्रिंट माध्यमं याबरोबर सोशल मीडियाही जनमत बनवतोय आणि सत्ताबदल घडवण्यास कारणीभूत ठरतोय. हे बघितलं की, पूर्वीची माध्यमांची माहिती देणं या मुख्य उद्देशाचा विकास होऊन आता विकासात्मक बातमीदारीच्या दिशेनं मीडियाचं पुढचं पाऊल पडतंय याची अनुभूती येतेय.
सामान्यांना आवडणार्या विषयाची दखल घेणं यापेक्षाही जो विषय जनसामान्यांच्या दृष्टीनं आवश्यक असेल तर त्या नावडत्या विषयालाही हात घालणं. तो समजवण्यासाठी अनेक प्रभावी साधनांचा वापर करणं. अशी अनेक वैशिष्ट्ये मला या निमित्तानं बदलणार्या माध्यमातून दिसून येत आहे. लोकलमध्ये प्रवास करताना भेटणारी मित्रमंडळी आणि वर्तमानपत्रातील बातमीवर चर्चा करणारी अनेक चाकरमानी मंडळीसुद्धा माध्यमाविषयी आपुलकीने बोलताना दिसतात, भेटतात. म्हणूनच दिल्लीतल्या आम आदमी पार्टीकडून चांगल्या कामाच्या अपेक्षा ठेवणार्या सर्वसामान्यासारखीच माध्यमाकडून सकारात्मक अपेक्षा ठेवणार्या माध्यमप्रेमीची संख्या वाढताना दिसतेय. मला वाटतं की, ही एका चांगल्या बदलाची सुरुवात आहे.