बदलती जीवनशैली, ताण-तणावाचं वाढतं प्रमाण, पुरेशा व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आदी कारणांमुळे हृदय विकार असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
हृदय विकार म्हटलं की लोकांमध्ये अनामिक भीती तयार होते. अर्थात हा आजार जीवघेणा ठरण्याची शक्यता असल्यानं भीती वाटणं साहजिक आहे.
परंतु, जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला तसेच उपचार घेतल्यास ह्रदय विकार नियंत्रणात ठेवता येतो.
हृदयाला होणारा रक्त पुरवठा ठप्प झाल्यास किंवा कोणत्याही प्रकारे त्यात अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो.
हा अडथळा प्रामुख्यानं चरबी, कोलेस्ट्रेरॉल किंवा अन्य पदार्थांमुळे निर्माण होतो. यामुळे हृदयाकडे जाणाऱ्या धमन्यांवर परिणाम होतो.
हृदय विकाराचा झटका आल्यास छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला काही वेळापुरते दुखू लागते. त्यामुळे अस्वस्थता जाणवू लागतं. हे लक्षण काही वेळेपुरतं दिसतं.
हृदय विकाराचा झटका आल्यास अशक्त वाटू लागतं. डोकं हलकं वाटतं तसेच शरीर थंड पडल्यासारखं वाटू लागतं.
हृदय विकाराचा झटका आल्यास जबडा, मान आणि पाठीत वेदना जाणवू लागतात आणि अस्वस्थता वाटू लागते. तसेच एक किंवा दोन्ही हात आणि खांदे दुखू लागतात.
हार्ट अटॅक आल्यास छातीत वेदना होऊ लागतात. तसेच छातीत अस्वस्थ वाटू लागतं. परिणामी श्वास घेण्यास त्रास होतो. अनेकदा चक्कर देखील येते.
काही रुग्णांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर मळमळ जाणवू लागते. उलटी देखील होते.
हालचाली केल्यानंतर छातीत वारंवार दुखणं आणि शांत बसल्यावर बरं वाटणं हे हृदयविकाराचं प्राथमिक लक्षणं असू शकतं. पुरुषांमध्ये हे लक्षण प्रामुख्याने दिसून येतं.
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ही व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकतात. काही लोकांना तीव्र वेदना जाणवतात तर काही लोकांना कमी प्रमाणात वेदना होतात.
काही लोकांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. लक्षणांची तीव्रता जितकी अधिक असते तितका हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.
काहींना अचानक हृदय विकाराचा झटका येतो. मात्र काही रुग्णांमध्ये झटका येण्यापूर्वी काही तास, काही दिवस किंवा काही आठवडे लक्षणं दिसून येतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
डोळे निरोगी ठेवण्यासाठी या 4 टिप्स
Click Here