फ्लॅशबॅक 2014 : एक होतं माळीण गाव आणि शापित सौंदर्य !

फ्लॅशबॅक 2014 : एक होतं माळीण गाव आणि शापित सौंदर्य !

  • Share this:

[wzslider]

ज्या हिरवगार निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी एंजॉय करायची म्हणजे तो निसर्ग ? की, पाण्याच्या महापुरात घरच्या-घरं वाहुन गेली...त्यानंतर उघड्यावर पडलेले संसार...,जमीनदोस्त झालेली घरं...चिखल आणि दगडच दगडं...कुजलेल्या प्रेतांचा दुर्गंध.... 'हिरवे हिरवे गार गालिचे...' ही शब्द पुस्तकातच बरी वाटता अशी समजूत सरत्या वर्षात झाली. ज्या डोंगराला आधारवड समजून वसलेलं गाव निसर्गाच्या प्रकोपात एका रात्रीत गायब झालं...तर दुसरीकडे भारताचं नंदनवन असलेलं जम्मू-आणि काश्मीर पाण्याच्या मगरमिठ्ठीत कवटाळलं गेलं...निसर्गाच्या या आपत्तीला सामोरं गेलंलं हे वर्ष....त्याबद्दलचा आढावा...

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकरजवळच माळीण गाव...निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं 50 ते 60 घरांचं हिरवगार गाव...मात्र जुलैची एक पहाट माळीणच्या गावकर्‍यांसाठी अंधारमय ठरली. पहाटेच्या साखर झोपेत असलेल्या गावकर्‍यांशी निसर्गाने क्रुर चेष्टा केली... डोंगरपायथ्याशी वसलेलं हे निसर्गरम्य हे गाव ज्या डोंगराने कुशीत घेतलं तोच डोंगर गावावर कोसळला. डोंगरकडा कोसळल्यामुळे 44 घरं ढिगाराखाली दबली गेली ती कायमची....माणसं तर अडकलीच पण मुकी जनावरंही या ढिगाराखाली गाडली गेली. अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. होतं नव्हतं सार गाडलं गेलं..कुणी घरच्या माणसाच्या चिखलात शोध घेत होतं तर कुणी घराची भांडी गोळा करत होतं...या अस्मानी संकटामुळे गावकर्‍यांवर दुखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेत 151 लोकांचा मृत्यू झाला. शेकडो जनावरं मृत्युमुखी पडली. कधी काळी इथं गावं होतं याचा नामोनिशाण राहिला नाही...हा निसर्गाचा कोप होता की, मानवनिर्मित दुर्घटना याचा शोधही घेतला गेला..राज्य सरकारकडून पुर्नवसनही झालं. पण डोंगराने गिळलेलं गाव आणि त्याचं नावं याचं पुर्नवसन होऊ शकलं नाही. राज्याच्या नकाशावर असलेलं अंधुकसं असं गाव साफ पुसलं गेलं.

निसर्गाने या गावासोबत केलेली ही थट्टा पुरे नव्हती की, काय पुन्हा एकदा याने भारताचा स्वर्ग समजल्या जाणार्‍या जम्मू आणि काश्मिरवर आपली वक्रदृष्टी टाकली. सप्टेंबरमध्ये जम्मू आणि काश्मिरमधील जवळजवळ अडीच हजार गावं अतिवृष्टी आणि पुराने प्रभावित झाली आणि तब्बल चारशे गावं पाण्याखाली गेली. दुथडी भरून वाहणार्‍या नद्यांच्या प्रवाहात जवळजवळ पन्नास पूलं वाहून गेली, घरेदारे पाण्याखाली गेली, हजारो कि.मी.चे रस्ते उखडले गेले. हजारोंना बेघर व्हावे लागले. काश्मीरमधील हे संकट अभूतपूर्व होतं. गेल्या किमान सहा दशकांमध्ये अशी पूरस्थिती तेथे कोणी पाहिली नव्हती. लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन हजारो पुरग्रस्तांचे जीव वाचवले. या निसर्गाच्या प्रकोपात 200 भारतीय तर पाकिस्तानात 190 लोकांचा मृत्यू झाला. लाखो लोकं बेघर झाले. तर संपत्तींचं कोट्यवधीचं नुकसान झालं. पुरामुळे 5400 ते 5700 कोटींचे नुकसान झालं. व्यापारी, हॉटेल्स, रेस्टॉरंट, फळबागांचं मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालं. एवढंच नाहीतर वीज, रेल्वे, दळणवळण आदी पायाभूत सुविधांही उद्‌ध्वस्त झाल्यात. स्वर्गाची ही दुनिया नेहमी गोळीबार, बॉम्बस्फोटाने हादरलेली असते...जणू ही काश्मीरवासीयांना हे सवयीचं झालेलं...पण अस्मानी संकटापुढे हा काश्मिरी हतबल झाला...स्तब्ध होईन स्वत: च्या संसाराची राखरांगोळी पाहण्यावाचून त्याच्याकडे काहीच राहिलं नाही...नव्या वर्षाचं सर्वत्र मोठ्या जल्लोषात स्वागत होईल पण नव्या वर्षाच्या स्वागतासाठी माळीण नसणार आणि नंदनवनातील पुरग्रस्त...

Follow @ibnlokmattv

First published: December 22, 2014, 8:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading