भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने नुकताच आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला.
त्याच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
या शर्यतीत आघाडीवर उपकर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची नावे आघाडीवर आहेत.
भारताचे माजी दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर व सुरेश रैना यांनी रिषभ पंत हा कर्णधार म्हणून योग्य असेल असे म्हटले आहे.
भारतीय क्रिकेटमधील कसोटी कर्णधारांचा प्रवास पाहता 7 खेळाडूंनी पूर्ण काळ कसोटी कर्णधार म्हणून जबाबदारी पाहिली आहे.
1990 मध्ये मोहम्मद अजहरुद्दिन यांना प्रथम नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हा ते 26 वर्षाचे होते. त्यांनी 47 कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी 1996 मध्ये दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कर्णधारपद भूषवले. त्याने 25 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले.
2000 मध्ये सौरव गांगुलीने ढाका येथे बांगलादेशविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारताचे नेतृत्व केले. तेव्हा त्याचे वय 28 होते. 2005 पर्यंत त्याने 49 कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले.
राहुल द्रविड यांनी 2003 मध्ये प्रथम कसोटीत कर्णधारपद भूषवले होते. परंतु, डिसेंबर 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पूर्णवेळ कर्णधार म्हणून त्याची वर्णी लागली. 2007 पर्यंत तो संघाचा कर्णधार होता.
अनिल कुंबळे भारताच्या या दिग्गज लेगस्पिनरच्या हाती 2007 मध्ये द्रविडनंतर भारतीय संघाची धूरा दिली होती. निवृत्तीपर्यंत तो संघाचा कर्णधार राहिला.
कुंबळेच्या निवृत्तीनंतर धोनीला कसोटीत कर्णधारपद मिळाले. 2008 ते 2014 पर्यंत तो संघाचा कर्णधार होता. 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीत त्याने प्रथमच भारताचे नेतृत्व केले.
धोनीनंतर कोहली भारताचा कर्णधार झाला. त्याने 9 डिसेंबर 2014 रोजी कसोटी कर्णधारपद स्वीकारले. त्यावेळी तो 26 वर्षांचा होता. कोहलीने भारतासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक 68 कसोटी सामने खेळले.