स्पॉट इडली करण्यासाठी तेल,  बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टमाटा, आलं लसणाची पेस्ट, मीठ, सांबार मसाला, कोथिंबीर, रवा आणि दही या सामग्रीची गरज आहे. 

स्पॉट इडली करण्यासाठी नॉन स्टिक तवा घ्यावा. त्यावर तेल घालावं. 

तेल गरम झालं की त्यात कांदा, हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट टाकून ते चांगलं परतून घ्यावं. 

नंतर टमाटा आणि मीठ टाकावं. हे सर्व परतून  मंद आचेवर शिजू द्यावं. 

मिश्रणातला टमाटा चांगला शिजला की मग बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सांबार मसाला घालावा. 

एका बाजूला मसाला करतानाच दुसऱ्या बाजूला रवा दह्याचं मिश्रण तयार करावं. 

मिश्रण इडलीच्या पिठाएवढं पातळ करावं. या मिश्रणात चवीपुरतं मीठ आणि चमच्याभर तेल घालावं. 

तव्यावरील मसाल्याचे चार भाग करावेत. गॅसची आच मंद ठेवावी. मग या मसाल्यांच्या चार भागावर चमच्यानं रव्याचं मिश्रण घालावं. 

वरुन थोडा सांभार मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

खोलगट झाकणीनं तवा झाकावा. साधारण मिनिटभरानंतर झाकण काढावं. इडल्या उलटवून् दुसऱ्या बाजूनंही शेकून घ्याव्यात. 

या स्पॉट इडल्या गरम गरम  पुदिना कोथिंबीरच्या हिरव्या चटणीसोबत छान लागतात.