सोलापूरची कडक भाकरी आणि शेंगाची चटणी ही जगप्रसिद्ध आहे. बरेच दिवस टिकणाऱ्या या भाकरीबद्दल सर्वांनाच कुतुहूल असतं.   

 या भाकरीची सिक्रेट रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या रेसिपीनुसार तुम्हीही घरी सोलापूरची जगप्रसिद्ध कडक भाकरी बनवू शकता.

कडक भाकरी आपण बाजरी किंवा ज्वारी या दोन्ही पिठाच्या बनवू शकतो.

प्रथम एका भांड्यात पीठ घेऊन मीठ आणि पाणी यांचे योग्य मिश्रण करून ते पीठ मळून घ्यावे.

पीठ मळताना एकच काळजी घ्यावी की घरगुती भाकरी करताना ज्याप्रकारे आपण पीठ घट्ट मळून घेतो, परंतु कडक भाकरी बनवताना पीठ थोडेसे पातळ मळून घ्यावे.

पिठाचे उंडे करून समान भागात ते वेगळे करून घ्यावेत. हातावर घेतलेल्या उंड्यावर तीळ लावून तो चारही बाजूने संपूर्ण पातळ होईपर्यंत भाकर थापून घ्यावी.

भाकरी थापताना भाकरीच्या मध्यभागी जर सर्वात पातळ भाग दिसू लागला की भाकर थोपणे थांबवावे. 

 त्यानंतर भाकरी तव्यावर भाजून घ्यावी. तव्यावर भाकरी भाजताना एकच काळजी घ्यावी की भाकरीला पाणी लावताना सर्व बाजूने समान पद्धतीने कापडाचा बोळा पाण्याने भिजवूनच लावावा. 

पाण्यामुळे भाकरी तुटत नाही आणि गॅस थोडा बारीक करून मंद आचेवर दुसऱ्यावर तुम्ही भाकरी भाजून घ्यावी.

आपण लावलेला ओलसरपणा भाकरीतून निघून जाईल आणि भाकरी कडक बनेल.